तळेगाव दाभाडे, ता.१९ : वर्षभरापूर्वी पतीचे झालेल्या निधनाच्या दुःखामधून सावरत मोठ्या जिद्दीने संसार सांभाळत असतानाच मावळ तालुक्यातील बेडसे गावातील एका महिलेवर पुन्हा मोठे संकट कोसळले. मंगळवारी (ता.१९) दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून तिचे घर पूर्ण जळून खाक झाले.
त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महिलेसह तिच्या कुटुंबापुढे आता निवाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शालन सोमनाथ दहिभाते असे त्या महिलेचे नाव आहे. दुपारच्या सुमारास अचानक घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. घर कच्च्या स्वरूपाचे असल्याने तसेच उष्णतेमुळे आग झपाट्याने पसरली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी भीषण होती की संपूर्ण घर काही वेळातच राख झाले.
या आगीत घरातील धान्य, तांदूळ, कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाली. अनेक वर्षांच्या कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत नष्ट झाल्याने दहिभाते यांच्यावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस प्रशासन तसेच वीज वितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागांकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसानीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.