तळेगाव दाभाडे, ता. १४ : ‘‘आरएमके समूह यंदा मावळ तालुक्यात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक ट्रकनिर्मिती आणि बॅटरी जोडणीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत,’’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
आरएमके समूहाच्या ‘एनर्जी इन मोशन’ प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, आमदार जयंत पाटील, आरएमके समूहाचे अध्यक्ष रामदास काकडे, समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित काकडे, ‘एनर्जी इन मोशन’चे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मुरकुंबी, उत्पादन प्रमुख महेश केसरकर, माजी मंत्री बाळा भेगडे, विलास लांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी २९ ऑगस्टला या प्रकल्पासाठी सामंजस्य करार झाला. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरातील चार्जिंगचा वेळ कमी करण्यासाठी बॅटरी बदलण्याची सुविधा उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बॅटरी अवघ्या सात मिनिटांत बदलून ट्रक पुन्हा वाहतुकीसाठी सज्ज करता येईल. भविष्यात महामार्गांवर बॅटरी बदल केंद्रांचे जाळे उभारल्यास मालवाहतुकीचा वेळ कमी होण्यास मदत होईल. इलेक्ट्रिक वाहनांवरील सुरुवातीचा अतिरिक्त खर्च इंधनावरील बचतीतून सुमारे तीन वर्षांत भरून निघू शकतो.’’ आरएमके समूहाने शेतकऱ्यांना सहभागी करून जमिनीच्या एकत्रीकरणातून औद्योगिक वसाहत विकसित करण्याच्या पद्धतीचे त्यांनी कौतुक केले.
इंधनखर्चात बचतीची अपेक्षा
‘‘वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे इंधनावरील परकीय चलनाचा खर्च आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. बॅटरी तंत्रज्ञानातील संशोधन आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरजही फडणवीस यांनी व्यक्त केली. सध्या प्रकल्पाची वार्षिक ट्रकनिर्मिती क्षमता पाच हजार असून, भविष्यात ती ५० हजारांपर्यंत वाढविली जाईल. भविष्यातील चार्जिंग केंद्रे आणि बॅटरी बदल केंद्रांसाठी राज्य सरकार सहकार्य करेल,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
मालवाहतूक क्षेत्रात बदल शक्य : शरद पवार
माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास मालवाहतूक क्षेत्रात बदल घडू शकतात. औद्योगिक विकासासोबत स्थानिक रोजगार आणि परिसराच्या प्रगतीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले,’’ असे पवार म्हणाले.
स्थानिक युवकांना रोजगार संधी : उपमुख्यमंत्री पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी औद्योगिक गुंतवणुकीचा लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांच्या वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि उद्योग व स्थानिक परिसर यांच्यात समन्वय राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
TDB26B06489
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.