तळेगाव स्टेशन, ता. ११ ः तळेगाव दाभाडे नागरपरिषदेकडून बसविण्यात आलेले पदपथ आणि चेंबरची झाकणे तुटलेली आहेत. अशा या निकृष्ट दर्जाच्या झाकणांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार फुटणाऱ्या चेंबरच्या झाकणांमुळे नगरपरिषद बांधकाम विभागाचे संबंधित कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची पाहणी करण्यात यावी त्याचबरोबर परिसरातील दुरावस्थेतील चेंबर आणि पदपथांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
स्टेशन विभागातील मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या वर्दळीच्या रस्त्यावरील जनरल हॉस्पिटल प्रवेशद्वारापासून पुढे संरक्षक भिंती लगतच्या पदपथावरील निम्म्याहून अधिक चेंबरची झाकणे फुटल्याने पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनली आहेत. चेंबरची झाकणे तुटल्याने ती पादचारी आणि छोट्या वाहनांसाठी अपघाती ठरत आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर पुन्हा ती बदलण्यात आली, तरी काही दिवसानी पुन्हा तुटतात. हाच क्रम वर्षानुवर्षे सुरु आहे. याच पदपथावरून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात. रस्त्यावरील पथदिवे विरुद्ध दिशेला असल्याने रात्रीच्या अंधारात पादचाऱ्यांना ही तुटलेली झाकणे दिसत नसल्याने त्यात पाय अडकून अपघाताचा धोका संभवतो. त्याच प्रमाणे, या पदपथांवर अनेक टपऱ्या देखील आहेत. त्यामुळे हा पदपथ नक्की कशासाठी? आणि नागरिकांनी चालायचे कसे आणि कोठून? असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. शहरात बऱ्याच मुख्य रहदारीच्या आणि अंतर्गत रस्त्यांसह पदपथावरील चेंबरच्या झाकणांची कमी अधिक फरकाने हीच स्थिती आहे.
जनरल हॉस्पिटल प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यानच्या पदपथावर चालताना तुटलेल्या झाकणात पादचाऱ्याचा पाय अडकून गंभीर अपघात होऊ शकतो. ही झाकणे खरोखरच इतकी निकृष्ट दर्जाची असावीत की ती फक्त पादचाऱ्यांच्या भाराने तुटावीत? असा प्रश्न पडतो आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने चेंबरची तुटलेली झाकणे लवकरात लवकर बसविण्यात यावीत.
- बाळकृष्ण घंगाळे, नागरिक, यशवंतनगर
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील गटारींच्या चेंबरच्या झाकणांचे सर्वेक्षण करून, तुटलेली झाकणे बदलून तेथे मजबूत झाकणे बसविण्याच्या सूचना मुख्यधिकाऱ्यानी दिल्या आहेत. मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान, पदपथांच्या पेव्हिग ब्लॉकवरील झाकणे प्राधान्याने बदलली जातील या दृष्टीने नियोजन सुरु आहे.
- राम सरगर, नगर अभियंता,तळेगाव दाभाडे नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.