तळेगाव स्टेशन, ता. २७ : ‘‘रागामध्ये माणसाचा विवेक संपतो. विवेक गहाण ठेऊन, चिडून घेतलेले निर्णय चुकतात. मन, बुद्धीला एक करून जाणीव जागृती करण्याचा संदेश गीतेत आहे. क्रोध नियंत्रणासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा आहे. तरुणांनी विवेक जागृतीद्वारे क्रोध नियंत्रणात ठेवावा,’’ असे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत शनिवारी ‘जानो गीता, बनो विजेता’ विषयावरील दुसरे विचारपुष्प गुंफताना डॉ. मालपाणी बोलत होते. कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया हे अध्यक्षस्थानी होते. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मालपाणी म्हणाले, ‘‘रणांगणावर गलितगात्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने दिलेल्या विजयाच्या मूलमंत्राची गीता ही तरुणांसाठीच आहे. गीतेत गुंफलेला धर्म म्हणजेच कर्तव्याचे पालन होय. पुत्रमोहाने आंधळा झालेल्या धृतराष्ट्रापासून सुरू झालेली गीता दिव्यदृष्टी प्राप्त अर्जुनावर थांबते. बोलण्याने नव्हे तर ऐकण्याने संवाद घडतो. संवादाने बांधलेले घर मजबूत असते. मात्र, हाच संवाद आजच्या परिवारामध्ये खुंटलेला दिसतो. कुणी ऐकून घेत नाही हे घराघरातले चित्र आहे. हसता हसता काहीही म्हटले तरी सर्व परिमाणे बदलतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना हसून सामोरे जाण्याने माणसातील विवेक जागा होतो. कामना आणि क्रोध हेच माणसाचे शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ हे नरकाचे तीन दरवाजे तुम्हाला नाशाकडे नेतात. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देणे गरजेचे आहे. ‘भागो नही, जागो’ असा संदेश देणारी गीता हे योग शास्र आहे. ’’
डॉ. फिरोदिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उद्योजक हिराचंद वालचंद यांचा जीवनपट उलगडून दाखवला. उपाध्यक्ष शैलेश शाह यांनी प्रास्ताविक केले. युवराज काकडे यांनी परिचय करून दिला. साहित्य श्रेत्रासाठी डॉ. सदानंद मोरे आणि उद्योग क्षेत्रासाठी उद्धव चितळे यांना इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवनिर्वाचित नगरसेविका सिया चिमटे, उद्योजक विक्रम काकडे यांचा सत्कार करण्यात आला. टाकवे येथील औद्योगिक वसाहतीचे नामकरण कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत असे करण्यात आले. संदीप काकडे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी नियोजन केले.
डॉ. संजय मालपाणी