तळेगाव स्टेशन, ता. १६ : खड्डे आणि वारंवार होणाऱ्या खोदाईमुळे मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे. मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगतच्या पदपथावर विखुरलेले पेव्हर ब्लॉक आणि सांडपाणी वाहिनीची उघडी चेंबर यामुळे यशवंतनगरकडे जाणारी वाट नागरिकांसाठी खडतर आणि धोकादायक बनली आहे.
चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता दशकभरापूर्वी शहरातील खड्डेमुक्त आणि अतिक्रमणमुक्त रस्ता म्हणून ओळखला जात होता. मात्र, कालांतराने विविध कामांसाठी झालेल्या खोदाईमुळे डांबरीकरण जीर्ण झाले. नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरात अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळेही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
दररोज शेकडो वाहने, विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या मार्गावरून ये-जा करतात. गतवर्षी एप्रिलमध्ये नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जुनी जलवाहिनी बदलण्यासाठी रस्त्याची खोदाई केली. यापूर्वीच चेंबरची झाकणे तुटल्याने बिकट अवस्थेत असलेला पदपथ या कामामुळे पूर्णतः उखडला गेला. कामानंतर करण्यात आलेली तात्पुरती दुरुस्ती पावसाळ्यात निष्प्रभ ठरली आणि रस्त्यावर ठिकठिकाणी डबकी साचली.
सध्या पदपथावर पेव्हर ब्लॉक अस्ताव्यस्त पडलेले असून, उघड्या चेंबरमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. रात्रीच्या वेळी वाहनांचे चाक चेंबरमध्ये अडकणे तसेच पादचारी घसरून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याकडेला साचलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. भरधाव चारचाकी वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्ड्यांची दोन-तीनदा दुरुस्ती करूनही काही दिवसांत पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. वीरचक्र चौक ते चाकण रस्त्यावरील जनरल हॉस्पिटल गेटपर्यंत वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. उखडलेले पदपथ आणि खड्ड्यांमुळे यशवंतनगर परिसरातील दैनंदिन प्रवास धोकादायक बनला आहे.
मुख्य रहदारीच्या रस्त्यांची अशी दुरवस्था होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची नाराजी आहे. उखडलेल्या पदपथाच्या पुनर्बांधणीस विलंब होत असल्याचीही चर्चा आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निदर्शनास आणूनही रस्ता व पदपथ नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही. निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर तरी प्रशासनाने या रस्त्यांचे पुनरुज्जीवन करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
‘‘मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला येत्या १५ दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. गटारीचे नवीन काम प्रस्तावित आहे. विखुरलेले पेव्हर ब्लॉक हटवून चेंबरला तात्पुरती झाकणे बसवून रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना केली जाईल.
- राम सरगर, शहर अभियंता, तळेगाव दाभाडे नगरपरिषद
‘‘मायमर कंपाऊंडला समांतर असलेल्या पदपथावर पूर्वी नगरपरिषदेतर्फे रोज स्वच्छता केली जात होती. वर्षभरापासून पदपथ उखडल्याने काहीही होत नाही. येथे वाळू साचली असून वाहने घसरतात, धूळ उडते. पादचारी आणि दुचाकींसाठी उघडे चेंबर धोकादायक आहेत. मराठा क्रांती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता वर्दळीचा असल्याने प्रशासनाने तातडीने पदपथांची पुनर्बांधणी आणि डांबरीकरण गरजेचे आहे.
- संदीप गोंदेगावे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.