तळेगाव स्टेशन, ता. १७ : मावळ आणि खेड तालुक्यातील औद्योगिक कामगारांच्या हक्काच्या आरोग्य सेवेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांनी ३५० खाटांच्या सर्व सोयीसुविधायुक्त ईएसआयसी रुग्णालयासाठी ८.५ एकर जागा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) यांना ९५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर नाममात्र दरात दिली आहे. त्यामुळे या बहुप्रतिक्षित रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मावळ व खेड तालुक्यातील सात लाखांहून अधिक ईएसआयसी कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ईएसआय शुल्क २०१६ पासून आकारले जात असले, तरी मावळ व खेड तालुक्यात कार्डधारक कामगारांसाठी थेट वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे लाभार्थींना योजनेचा पूर्ण लाभ घेता येत नव्हता. तळेगाव व चाकण परिसरातील काही खासगी रुग्णालयांशी भागीदारी करून ईएसआयसीकडून उपचारांची सोय करण्यात येत होती; मात्र संबंधित रुग्णालयांना देयके वेळेवर न मिळाल्याने अनेकदा गरजू रुग्णांना उपचार नाकारले जात होते. परिणामी कामगारांना महागड्या खासगी रुग्णालयांचा किंवा शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. जागेअभावी गेल्या दशकभरापासून रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर एमआयडीसीने चाकण औद्योगिक क्षेत्र, टप्पा क्रमांक २ मधील मौजे शिंदे गाव हद्दीतील पी-२३ क्रमांकाचा सुमारे ३२,९६० चौरस मीटर (८.५ एकर) भूखंड ईएसआयसीला भाडेपट्ट्यावर देऊ केला आहे. ८ जानेवारी रोजी एमआयडीसी आणि ईएसआयसी यांच्यात भाडेकरार करण्यात आला. प्रशासकीय मान्यतांनंतर लवकरच भूमिपूजन होऊन बांधकामास सुरुवात होणार आहे. सुमारे ५५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील सुमारे २५ लाख ईएसआयसी कार्डधारकांसाठी बिबवेवाडी येथील १२० खाटांचे एकमेव ईएसआयसी रुग्णालय कार्यरत असून त्याचा ३८० वाढीव खाटांसह विस्तार सुरू आहे. चाकण एमआयडीसीतील हे दुसरे रुग्णालय सुरू झाल्यानंतर पश्चिमोत्तर पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव एमआयडीसीसह मावळ व खेड तालुक्यातील लाखो कामगारांना मोफत व सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना अंतर्गतही गरजू रुग्णांना या रुग्णालयाचा लाभ होऊ शकणार आहे.
‘‘चाकण एमआयडीसीमध्ये ३५० खाटांच्या रुग्णालयासाठी ८.५ एकर जागा उपलब्ध झाली आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लवकरच ईएसआयसी रुग्णालयाच्या उभारणीचे काम चालू होईल. पुण्यातील बिबवेवाडी येथील विस्तारित ५०० खाटांचे रुग्णालयदेखील वाढीव क्षमतेसह वैद्यकीय सेवेसाठी लवकरच सज्ज होणार आहे.
- सुकांता चंद्र दास, संचालक, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे
‘‘चाकण औद्योगिक क्षेत्रातील सात लाखांहून अधिक ईएसआयसी कार्डधारक कामगारांची वैद्यकीय उपचारांसाठी होणारी परवड लक्षात घेऊन फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने याकामी २०१६ पासून दशकभर पाठपुरावा केला. यासाठी दिल्लीतील श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या ईएसआयसी मुख्यालयास अनेक भेटी दिल्या. संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबतच्या अनेक बैठकींनंतर अखेर एमआयडीसीने रुग्णालयासाठी भूखंड देऊ केला आहे. लवकरच या रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. ज्यामुळे निश्चितच गरजू कामगारांसाठी आरोग्यसेवा वाढेल.
- दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.