तळेगाव स्टेशन, ता.२० : यशवंतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (ता.१९) सकाळपासूनच फडकणाऱ्या भगव्या पताका आणि शिवजयंतीची लगबग दिसून येत होती. सायंकाळनंतर निघालेल्या मिरवणुकांत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शिवभक्तांमुळे शिवजयंतीचा उत्साह वाढला.
ओंकार जाधव मित्रमंडळातर्फे श्री शंकर मंदिरासमोरील पोस्ट ऑफिसपासून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. शोभेच्या फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राम, लक्ष्मण, सीता, हनुमानाच्या वेशभूषेतील व्यक्तिमत्त्वे शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
तपोधाम काॅलनीतील वराळे रस्त्यावरील स्वराज्य मित्र मंडळाकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. रात्री दहा वाजता दोन्ही मंडळांच्या मिरवणुकांसमोर मावळचे आमदार सुनील शेळके, तळेगावचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, नगरसेवक संदीप शेळके आदींच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. नगरसेवक सत्यम खांडगे, निखिल भगत, कल्पेश भगत, अनिकेत भेगडे, मंडळाचे अध्यक्ष ओंकार जाधव, स्वराज्य मित्र मंडळाचे करण शेळके आदींसह शिवभक्त उपस्थित होते.
डीजेच्या जुगलबंदीला पोलिसांकडून लगाम
दोन्ही मंडळाच्या मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री साडे आठच्या सुमारास समोरासमोर आल्यानंतर डीजे चालकांमध्ये गाणी वाजविण्याची चढाओढ लागली. दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन डीजे आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यातून गाणी वाजवत परस्परांना डिवचणे चालू झाले. दोन्ही बाजूकडील काही कार्यकर्तेही थेट डिजेच्या रॅकवर धोकादायक पद्धतीने उभे राहून एकमेकांकडे पाहून इशारे, हातवारे करू लागले. डीजे चालकांच्या या जुगलबंदीचे पर्यावसन कार्यकर्त्यांच्या वादविवादात होण्याची शक्यता लक्षात घेऊन चौकात बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस निरिक्षक कन्हैय्या थोरात यांनी डीजेचा ताबा घेऊन चालकांची खरडपट्टी काढली. तात्काळ डीजे बंद करत ते जप्त करण्याच्या सुचना पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे पावणेनऊच्या सुमारास चारही डीजे बंद झाले. डीजे बंद झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. मात्र, तत्पूर्वी किमान तासभर डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे यशवंतनगरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला.