तळेगाव स्टेशन, ता. ५ : बास्केटबॉल पोस्ट अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.५) सकाळी तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटच्या आवारात घडली. विशाल वर्मा (२०, तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूट विद्यार्थी वसतिगृह, इंदोरी, ता. मावळ, मूळ रा. अयोध्या, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘तोलानी संस्थेच्या मैदानावर विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते. या वेळी विशाल याने बास्केटबॉल पोस्टची रिंग पकडली असता, ती तुटली. त्याचवेळी लोखंडी राॅड विशालच्या अंगावर पडला. यात तो जखमी झाला. त्याला तळेगाव दाभाडे येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.’’
दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी या घटनेबाबत जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती घेतली. त्यानंतर काॅलेजमध्ये पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त विद्यार्थ्यांनी बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला. यातील काहींनी काॅलेजच्या प्राचार्यांच्या मोटारीची काचही फोडल्याचे समजते.
शवविच्छेदनानंतर सायंकाळी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी विशाल याचा चुलतभाऊ अनिरुद्ध परशुराम (३९, हिंजवडी फेज ३) यांचा जवाब नोंदवून घेत मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल वर्मा याच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचा आरोप
‘‘सकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेसंदर्भात कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती देण्यास उशीर केला. त्यामुळे पोलिस घटनास्थळी उशिराने पोचले,’’ असा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केला आहे. तर, या प्रकरणात महाविद्यालयाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, संस्थेत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.