तळेगाव स्टेशन, ता. २६ : यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका स्थलांतरित झाल्यानंतर उर्से व सोमाटणे येथील एक्झिट लेनमधून उलट्या दिशेने द्रुतगती मार्गावर घुसणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. सोमाटणे टोलनाक्यावरील पथकर टाळण्यासाठी अनेक वाहनचालक हा शॉर्टकट वापरत असून, आता अवजड टिप्परचालकही याच मार्गाने विरुद्ध दिशेने द्रुतगती मार्गावर प्रवेश करू लागल्याने भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मावळातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने पुणे व पिंपरी-चिंचवडकडे जाणारे अनेक वाहनचालक सोमाटणे टोलनाका टाळण्यासाठी उर्से खिंड व सोमाटणे येथील एक्झिट लेनमधून उलट्या दिशेने जाऊन किवळे, मामुर्डी व रावेतकडे जातात. या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी बेशिस्त वाहनचालक त्याची पर्वा करत नसल्याचे दिसून येत आहे. अलीकडे अवजड टिप्परही याच मार्गाचा वापर करू लागल्याने धोका अधिकच वाढला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिस, तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग आणि आयआरबी यांनी संयुक्त कारवाई करून उलट्या दिशेने प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
टिप्पर चालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली
मावळातील स्टोन क्रशरमधून पिंपरी-चिंचवड, रावेत परिसराकडे जाणारे अनेक टिप्पर मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाट्यावरून उजवीकडे वळून उर्से खिंड अथवा सोमाटणे फाट्यावरून थेट उलट्या दिशेने द्रुतगती मार्गावर प्रवेश करतात. अशा वेळी टिप्परला मोठे वळण घ्यावे लागत असल्याने मुंबईकडून येणाऱ्या दोन-तीन मार्गिका काही काळ अडवल्या जातात. अचानक समोर आडवा आलेला टिप्पर पाहून वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडते.
मावळातील मंगरुळ, आंबळे परिसरातील स्टोन क्रशरमधून उचललेल्या खडी, क्रश सँडची वाहतूक करणारे टिप्पर क्षमतेहून अधिक भरलेले दिसतात. यावर कोणतेही आच्छादन नसल्याने धूळ उडते व क्रश सँड रस्त्यावर सांडत राहते. त्यामुळे दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या डोळ्यात धूळ उडून अपघाताचा धोका संभवतो. यामुळे दुचाकी घसरून अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
विना नंबरप्लेट टिप्परमुळे कारवाईत अडथळे
मामुर्डी, पुनावळे, रावेत आणि ताथवडे परिसरातील वाहतूकदारांचे अनेक टिप्पर मावळातील स्टोन क्रशरमध्ये ये-जा करतात. नियमभंग करणाऱ्या अनेक टिप्परवर नंबरप्लेट नसते किंवा ती काळ्या रंगाने झाकलेली असल्याने वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अपघात अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.
बेशिस्त टिप्परचालकांवर कारवाईची मागणी
कोविडनंतर स्थानिक स्टोन क्रशर मालकांनी स्वतःच्या वाहनांची संख्या कमी केल्यामुळे बाहेरील वाहतूकदारांच्या टिप्परवर वाहतूक अवलंबून आहे. क्रश सँडवर आच्छादन घालण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असल्या तरी त्याचे पालन होत नसल्याचे स्टोन क्रशर चालकांचे म्हणणे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टिप्परचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वडगाव व तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे यापूर्वीच केली असल्याचे एका स्थानिक स्टोन क्रशर चालकाने सांगितले.
‘‘सोमाटणे टोलनाक्यावरील पथकर टाळण्यासाठी अनेक टिप्परचालक थेट द्रुतगती मार्गावर जाऊन पुणे व पिंपरी-चिंचवडकडे जातात. उर्से खिंड आणि सोमाटणे येथून नो-एन्ट्रीतून प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, अनेक टिप्परच्या नंबरप्लेट झाकलेल्या किंवा छेडछाड केलेल्या असल्याने कारवाई करण्यात अडचणी येतात. अशा वाहनांमुळे द्रुतगती मार्गावरील अपघाताचा धोका वाढला आहे.
- महादेव तुपारे, व्यवस्थापक, आयआरबी, सोमाटणे टोल प्लाझा
‘‘द्रुतगती मार्गावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.’’
- गजानन मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.