वडगाव मावळ, ता. २२ : वडगाव नगर पंचायतीच्या वतीने नागरिकांना घरबसल्या करभरणा करता यावा, यासाठी सोप्या पद्धतीने ऑनलाइन करभरणा सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. नागरिक आता कर पावतीवर असणारा क्यूआर कोड स्कॅन करून करभरणा करू शकतात. तसेच www.vadgaonmc.org या वेबसाइटवर जाऊनसुद्धा वॉर्ड नंबर व मालमत्ता क्रमांक टाकून गुगल पे, फोन-पे, युपीआय पेमेंट तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्डनेसुद्धा करभरणा करू शकतात, अशी माहिती निकम यांनी दिली.
डॉ. निकम म्हणाले,‘‘वडगाव नगर पंचायतची स्थापना तीन फेब्रुवारी २०१८ रोजी झाली. तत्पूर्वी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात होती. नगर पंचायत झाल्यावर महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ चतुर्थ वार्षिक कर आकारणी करणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने नऊ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या नगरपंचायत सर्वसाधारण सभेत भांडवली मूल्यावर करमूल्यांकन करण्यासाठी ठराव करण्यात आला होता. शहरातील सर्व मालमत्तांना नंबर देणे, प्रत्येक मिळकतीचे मोजमाप करणे, जीआयएस फोटो काढणे, वडगाव शहराचा नकाशा तयार करणे व सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये फीड करणे इत्यादी कामे करण्यात आली. सक्तीच्या कराबाबतच्या १५ जुलै २०२२ च्या वडगाव नगरपंचायत विशेष सभेत अधिनियमातील तरतुदीनुसार कमीत कमी कर आकारणीसाठी दर ठरविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. सामान्य करासोबत वृक्षसंवर्धन कर, अग्निशमन कर, पथकर, शिक्षणकर व रोजगार हमीकर इत्यादी कर लागू करण्याबाबत या सभेने मान्यता दिली.
अंतिम याद्या तयार
सर्वे पूर्ण झाल्यानंतर प्रारूप याद्या तयार करून प्राधिकृत मूल्यनिर्धाण अधिकारी तथा सहायक संचालक नगररचना पुणे यांना सादर करण्यात आल्या होत्या. नगररचना विभाग, पुणे यांना प्रारूप याद्या प्रमाणित करून २१ ऑगस्ट २०२३ रोजी नगरपंचायतीस देण्यात आल्या. प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात येऊन नागरिकांच्या हरकती व आक्षेप मागविण्यात आले. या काळात क्षेत्रफळ दुरुस्ती व करसंबंधी ४४३ तक्रार अर्ज तसेच नावात दुरुस्ती व मिळकत क्रमांकात दुरुस्तीचे ४०० अर्ज असे ८४३ अर्ज प्राप्त झाले. सहायक संचालक नगररचना पुणे यांनी आक्षेपांवर सुनावणी घेतली. या सुनावणीस २८२ नागरिक हजर होते. सुनावणीमधील देण्यात आलेल्या आक्षेपानुसार त्या मालमत्तेचे पुन्हा मोजमाप करण्यात आले व त्यानुसार असणारे बदल करण्यात आले. सर्व आक्षेपांचा निपटारा केल्यानंतर अंतिम याद्या तयार करण्यात येऊन सहायक संचालक नगररचना पुणे याच्याकडे प्रमाणित करण्यासाठी देण्यात आल्या. त्यानुसार नगररचना विभागाने अंतिम याद्या प्रमाणित करून नगर पंचायतीस सादर केल्या. त्यानुसार वडगाव नगरपंचायतीने चतुर्थ वार्षिक करआकारणीच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम बिले वाटण्यात आली व कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.