वडगाव मावळ, ता.२७ : मावळ तालुक्याच्या काही भागांत जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन मावळ पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
मावळ तालुक्यात फेब्रुवारी ते मे २०२४ पर्यंतच्या काळात २३ हजार ७०० लसमात्रांद्वारे २० हजार ८८४ गायी, बैल, वासरे आदी जनावरांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, लसीकरण काळात गावात नसलेली अथवा नव्याने खरेदी करण्यात आलेली जनावरे लसीकरणापासून वंचित राहिली असण्याची शक्यता आहे. अशा काही जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वेळेत व योग्य औषधोपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे, पशुपालकांनी जनावरांच्या अंगावर फोड येणे, त्यांचे पाय सुजणे आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. लसीकरण केल्यास लम्पी आजाराची शक्यता कमी होते, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
लम्पी आजाराची कारणे, उपाय...
- डास, माशा यासारख्या परोपजीवी किटकांपासून प्रादुर्भाव
- जनावरांचा गोठा व त्याचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- गोठ्यामध्ये सायंकाळी धूर केल्यास डास राहणार नाहीत
लसीकरणापासून वंचित राहिलेल्या जनावरांना आवश्यकतेनुसार लस उपलब्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी पशुधन पर्यवेक्षक दीपक राक्षे, दूरध्वनी क्रमांक ९८९०९९०६५८ यांच्याशी संपर्क साधावा.
- डॉ.अनिल परंडवाल, पशुधन विकास अधिकारी, मावळ
मावळ तालुक्यातील पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे आदी गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. पुसाणे गावातील चार जनावरे दगावली आहेत. त्यामुळे, पशुसंवर्धन विभागाने लसीकरणासह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
- नितीन ओव्हाळ, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मावळ तालुका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.