वडगाव मावळ, ता.१८ : ‘‘मावळ तालुक्यातील सहकारी गृहरचना संस्थांच्या प्रतिनिधी अथवा सभासदांनी सहकार विभागाच्या कामकाजातील अडचणी व तक्रारींबाबत वडगाव येथील सहकारी संस्था कार्यालयाकडे अर्ज दाखल केल्यास त्यावर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,’’ अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली.
सहकार विभागाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अभियांनातर्गत मावळ तालुक्यातील सहकारी गृहरचना संस्थांच्या सोयी सुविधा व सभासदांच्या येत असलेल्या अडचणींबाबत आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच हाउसिंग दरबार व संवाद बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्यासह तालुक्यातील सुमारे सातशे ते आठशे सहकारी गृहरचना संस्थांचे प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते.
सहकारी संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम कन्व्हेन्स) बाबत बोलताना जगताप म्हणाले, ‘‘तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे संस्थांचे अभिहस्तांतरण बिल्डरकडून होत नसल्यास मानीव अभिहस्तांतरण प्रस्ताव सादर करावेत. हे प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. संस्थेच्या सभासदांना व प्रतिनिधींना सहकार विभागाच्या कामकाजातील असलेल्या अडचणी व तक्रारीबाबत आमच्या कार्यालयाकडे अर्ज दाखल केल्यास त्यावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. अन्य तक्रारींबाबत विविध खाते उदा. पीएमआरडीए, सिटी सर्वे कार्यालय, पाणी पुरवठा विभाग कार्यालय, संबंधित नगरपरिषद, गटविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.’’
आमदार शेळके यांनीही सर्व प्रश्न समजावून घेऊन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करुन ते मार्गी लावण्याची सूचना केली आहे. तालुक्यात प्रथमच आयोजित या उपक्रमात गृहरचना संस्थेच्या मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याचे कांदळकर यांनी सांगितले. यापुढील काळातही असे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.