वडगाव मावळ, ता.४ : वडगाव नगरपंचायतीने येत्या ३१ मार्चपर्यंत १०० टक्के मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले असून करवसुलीसाठी दंडात्मक तसेच नळजोड तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
वडगाव नगरपंचायतीची घरपट्टी कराची वार्षिक मागणी ९ कोटी रुपये असून आतापर्यंत त्यापैकी २ कोटी ८५ लाख रुपये वसुल झाले आहेत. तसेच पाणीपट्टी कराची वार्षिक मागणी १ कोटी ४६ लाख रुपये असून आतापर्यंत त्यापैकी ६० लाख रुपये कर वसुली झाली आहे. दोन्ही मिळून अद्याप ७ कोटी रुपये कर येणे बाकी आहे. चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने नगरपंचायतीने ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कर वसुलीसाठी पाच पथके तयार करण्यात आली असून ती घरोघरी जाऊन नागरिकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. फिरत्या गाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये ज्या मिळकत धारकांची थकबाकी आहे, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. थकबाकीवर दोन टक्के दंड लावण्यात येणार आहे.
कर भरण्यासाठी सुविधा
मिळकत धारकांना सुट्टीच्या दिवशीही म्हणजे शनिवार व रविवार या दिवशीही नगरपंचायत कार्यालयात येऊन कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिळकतधारक ऑनलाइन पद्धतीनेही कर भरू शकतात. त्यासाठी बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून व www.npvadgaon.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आदींचा वापर करून कर भरणा करता येईल. कर बिलाबाबत तक्रार असल्यास नगरपंचायत कार्यालयात अर्ज देऊन तत्काळ बिल दुरुस्ती करून देण्यात येत आहे. यासाठी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.
शहराचा सर्वांगीण विकास तसेच पाणी, रस्ते, पथदिवे आदी सोयी सुविधा पुरविण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे. नगरपंचायतीला कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही. परंतु वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांवर नाईलाजाने कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. नागरिकांनी त्वरित कर भरणा करून नगरपंचायतीस सहकार्य करावे व कटुता टाळावी.
- डॉ.प्रवीण निकम, प्रशासक तथा मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.