वडगाव मावळ, ता. १३ : वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी ‘मतदार जनजागृती’ अभियान राबविण्यात आले.
शहरातील गर्दीची ठिकाणे, अध्यापक महाविद्यालय, रमेशकुमार सहानी महाविद्यालय येथे मतदानाचे महत्त्व पटवून मतदार प्रतिज्ञा घेत ‘मतदार जनजागृती’ उपक्रम राबविण्यात आला. लोकशाहीत मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे ही जबाबदारी आहे. ‘माझे मत, माझा हक्क -प्रत्येक मतदार, देशाचा बळकटीदार!’ या घोषवाक्याखाली मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन करण्यात आले.
नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदार ओळखपत्रासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. एक मत लोकशाहीत परिवर्तन घडवू शकतो, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरुवारी(ता. १३) चौथ्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती तेलभाते यांनी दिली.