ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. १९ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत होणार असल्याचे छाननीनंतर स्पष्ट झाले आहे. मात्र, नगरसेवकपदासाठी अनेक प्रभागात पक्षाचा आदेश नसताना अर्ज दाखल केलेल्या बंडोबांना थंड करण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर उभे ठाकले आहे.
वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ८२ अर्ज दाखल झाले होते. छाननीत नगराध्यक्षपदाचा एक तर नगरसेवकपदाचे ११ अर्ज बाद झाले. माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाल्याने आता या पदासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदासाठी १७ पैकी सहा ते सात प्रभागात सरळ तर उर्वरित प्रभागात तिरंगी व चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीचे चित्र २१ तारखेला अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट होईल. काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या याद्या विलंबाने जाहीर केल्या. उमेदवारी न मिळालेल्या दोन्ही पक्षातील काही इच्छुकांनी पक्षाचा आदेश नसताना उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज ते मागे घेणार की बंडाचे निशाण फडकविणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी या नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचे व रिंगणातून बाहेर पडण्यास परावृत्त करण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे आहे. अन्यथा काही प्रभागांमध्ये तिरंगी व चौरंगी लढती अटळ आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत
वडगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतरची ही दुसरी निवडणूक आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये तीव्र स्पर्धा होती. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे व माजी उपसभापती गणेश ढोरे यांच्या कन्या सुनीता कुडे या दोघींनी उमेदवारीसाठी पक्षाकडे दावा केला होता. आमदार सुनील शेळके व कोअर कमिटीने पाच वर्षांत दोघींना संधी देण्याचे ठरवून समेट घडवून आणला व उमेदवारीची पहिली संधी अबोली ढोरे यांना दिली. भाजपमध्ये या पदासाठी स्पर्धा नव्हती. मनसेच्या माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या उमेदवारीने या पदासाठी तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने आता या पदासाठी दुरंगी सामना निश्चित झाला आहे.
नगरसेवक पदासाठी स्पर्धा
नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. निवडणूक दोन वर्षे निवडणूक लांबल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच पन्नास टक्क्यांहून अधिक प्रभागांचे गेल्या निवडणुकीच्या वेळेस असलेले आरक्षण कायम राहिल्याने अगोदरचे नगरसेवक पुन्हा रिंगणात आले. १७ पैकी पाचच जागा सर्वसाधारण राहिल्याने या जागांवर स्पर्धा वाढली. नऊ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी हट्ट धरला व अर्ज दाखल केले. नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तीन या पाच प्रभागामध्येही अनेक जण कुणबी दाखल्यांवर निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरले. छाननीनंतर काही जागांच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. सद्यःस्थितीत सहा ते सात प्रभागांत दोन उमेदवारांमध्ये सरळ सामना होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग दोन, तीन, सात, नऊ, अकरा, बारा, तेरा व सोळामध्ये अर्जांची संख्या अधिक असून, येथील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथे बंडाचे निशाण फडकू पाहणाऱ्या इच्छुकांना शांत करण्याचे आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे. त्यात त्यांना अपयश आल्यास या प्रभागांमध्ये तिरंगी व चौरंगी लढती अटळ आहेत. २१ तारखेला अर्ज माघारीच्या दिवशी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज अपवादानेच असल्याने या दोन पक्षातच प्रामुख्याने लढत होणार हे मात्र निश्चित झाले आहे.