(लेख वाचला आहे)
पर्यटकांना हवी विश्वासार्हता
मावळ तालुका सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला, निसर्गसौंदर्याची विलक्षण उधळण झालेला आणि इतिहास-संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारा प्रदेश आहे. गेल्या काही वर्षांत मावळातील पर्यटनाची ओढ देश-विदेशातील पर्यटकांना लागत आहे. सुट्टीतील गर्दी, किल्ल्यांचे ट्रेक, धबधब्यांवरील तरुणाईची भेट, तलाव परिसरातील निवांत पर्यटन या सगळ्यामुळे मावळाचे पर्यटन झपाट्याने वाढत आहे.
- अतुल वायकर, व्यावसायिक, वडगाव मावळ
मावळ तालुक्यात सध्याच्या काळात पर्यटन वाढत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधीही त्याच वेगाने उभ्या राहत आहेत. पारंपरिक शेतीची व्याप्ती पवन, नाणे आणि आंदर मावळात कमी होत चालली आहे. शेतजमिनी तुकड्या-तुकड्यांनी विभक्त होत असल्याने तरुणांसमोर नवी दिशा म्हणून पर्यटनाशी निगडित व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. मावळाचे भौगोलिक स्थानही अत्यंत उपयुक्त आहे.
व्यावसायासाठी दालन खुले
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग, लोहमार्ग, तसेच लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, देहूरोड यांसारखी शहरे जोडणारे रस्ते, या सगळ्यामुळे पर्यटकांची ये-जा सोपी आणि वेगवान झाली आहे. पवना धरण, तलावांचा निसर्गमय प्रदेश, पाणीवाहिन्या, ओढे, दऱ्या, हिरवीगार वनराई निसर्गाने मावळावर मुक्त हस्ताने उधळण केली आहे. यामुळे छोट्या गावांपासून ते शहरांपर्यंत पर्यटन व्यवसायाचे जाळे वाढत आहे. कार्ला, पवनानगर, इंदोरी, नवलाख उंब्रे, सुदुंबरे, उर्से, भोयरे, मंगरूळ अशा गावांमध्ये नागरीकरणाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवासी प्रकल्प, व्यावसायिक दुकाने, सेवा क्षेत्र, हॉटेल व्यवसाय, ट्रान्सपोर्ट सुविधा या सर्वांची मागणी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे तरुणांना कौशल्याधारे, कमी भांडवलात सुरू होणाऱ्या आणि त्वरित विस्तार होऊ शकणाऱ्या व्यवसायांचे दालन खुले झाले आहे.
गुणवत्ता महत्वाची
पर्यटन क्षेत्रात रोजगाराची संधी सर्वांत जास्त आहे. या क्षेत्रात सर्वात महत्त्वाचे आहे ते सेवा आणि गुणवत्तेचे जतन. पर्यटकांना आज फार काही वेगळे नको आहे; त्यांना अपेक्षित आहे ते स्वच्छता, वेळेवर मिळणारी सेवा, आदरातिथ्य, विश्वासार्हता आणि विनम्र वर्तन. या मूलभूत गोष्टींची किंमत आज अत्यंत मोठी आहे. त्यामुळे छोटे व्यवसायही काही वर्षांत मोठे होतात. फूड व्यवसायात गुणवत्ता आणि स्वच्छता, होमस्टेत आराम आणि सुरक्षितता, टूर सेवेत वेळेचे काटेकोर पालन, ट्रेकिंग गाईडकडे अनुभव आणि मार्गदर्शनाची क्षमता हे घटक जितके बळकट तितका व्यवसायाचा पाया मजबूत. अनेक तरुण एका छोट्या खोलीतून, स्वतःच्या वाहनातून किंवा घरातील एखाद्या रिकाम्या जागेतून व्यवसाय सुरू करतात आणि काही वर्षांत तोच व्यवसाय ब्रॅण्ड बनतो.
रोजगार निर्मितीत वाढ
कारण पायाभूत गोष्ट असते गुणवत्ता आणि विश्वास. माऊथ पब्लिसिटी या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची ठरते. समाधान देणारी सेवा दिली की त्या व्यवसायाला स्थिर वाढ मिळते. आज मावळातील अनेक तरुण ‘नोकरी मिळत नाही’ या विचारात अडकून न राहता ‘उद्योजक होऊ’ या कल्पनेने पुढे जात आहेत. पर्यटनामुळे घरबसल्या रोजगार निर्मिती वाढली आहे. महिलाही व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
नव्या वाटांना यश
स्थानिक उत्पादनांची विक्री, घरगुती खाद्यपदार्थ, ट्रेकर्ससाठी मार्गदर्शक सेवा, कॅम्पिंग, होमस्टे, बोटिंग, ट्रान्सपोर्ट, फोटोग्राफी, ऑनलाइन बुकिंग सेवा या सर्वांमध्ये तरुणाईने नवे प्रयत्न सुरू केले आहेत. मावळातील पर्यटन जसजसे वाढत आहे, तसतसे रोजगाराच्या नव्या वाटाही उघडत आहेत. आकांक्षा, प्रामाणिक प्रयत्न, गुणवत्तेची जपणूक आणि ग्राहकांशी विश्वासाचे नाते यांचा मेळ घातला, तर मावळातील प्रत्येक गाव उद्योजकतेचे केंद्र बनू शकते. नोकरी हा पर्याय असू शकतो, पण आज मावळ दाखवून देत आहे की रोजगार निर्माण करणे हीच खरी प्रगतीची नवी दिशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.