वडगाव, ता. २५ : नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रमुख लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करत प्रचार सुरू आहे. नगरपंचायतीत सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने; तर ती खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे निवडणुकीचा फड उत्तरोत्तर रंगण्याची चिन्हे आहेत.
- ज्ञानेश्वर वाघमारे
वडगाव निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप नगराध्यक्षपदासह प्रत्येकी १७; तर शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी एक जागा लढवत आहे. मनसेच्या माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद झाला असून, त्या आता एका प्रभागात नगरसेवकपदासाठी अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगरसेवकपदासाठी दाखल केलेला एकमेव अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे.
नगराध्यक्षपदासाठी रंगतदार लढत
वडगावचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी पूर्वीपासून केली होती. तर, भाजपने पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या कन्या ॲड. मृणाल म्हाळसकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेदवारीचा पत्ता ऐनवेळी खुला केला. सुशिक्षित व नवा चेहरा म्हणून त्यांना समोर आणले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे व अपक्ष उमेदवार नाजमाबी शेख यादेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, शहरात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा आरंभ केला. या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांत शहरात रस्ते, भूमिगत गटारे, पथदिवे, नगरपंचायत इमारत व नव्याने करण्यात येत असलेली नळ पाणीपुरवठा योजना अशी सुमारे दीडशे कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे विकासाच्या जोरावर विजय प्राप्त करण्याचा विश्वास ते व्यक्त करत आहेत. तर, भाजपकडून राष्ट्रवादीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. शहरात अनेक विकासकामे प्रलंबित असून विकास आराखडा तयार करताना सर्वसामान्यांवर अन्याय केल्याचा आरोप ते करत आहेत. ही महिलांमधील लढत असली, तरी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्यातील लढत या दृष्टिकोनातूनही या लढतीकडे पाहिले जात आहे.
ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर हे भाजपचे निवडणूक प्रभारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने या निवडणुकीसाठी एकीचे चित्र जुळवून आणले आहे. त्यातूनच त्यांनी नगरसेवकपदाच्या लढतीमधील बंडाळी टाळण्यात यश मिळवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी दोन गटांमध्ये तीव्र स्पर्धा होती. अबोली ढोरे व माजी उपसभापती गणेश ढोरे यांच्या कन्या सुनीता कुडे या दोघींनी उमेदवारीसाठी पक्षाकडे दावा केला होता. आमदार सुनील शेळके व कोअर कमिटीने पाच वर्षांत दोघींना संधी देण्याचे ठरवून समेट घडवून आणला व उमेदवारीची पहिली संधी अबोली ढोरे यांना दिली. नगरसेवकपदासाठीच्या लढतींमध्ये काही प्रभागांमध्ये झालेली बंडखोरी शमविण्यासाठी पक्षाचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. एकास एक लढतीचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यात त्यांना काही प्रभागात यशही आले आहे. बंड केलेले उमेदवार आता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंब्याचे पत्र देत आहेत. आमदार सुनील शेळके यांनी येथील निवडणूक गांभीर्याने घेतली असून कोणत्याही परिस्थितीत विजय प्राप्त करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.
मागील पक्षीय बलाबल (२०१८)
राष्ट्रवादी काँग्रेस : ८
भाजप : ७
मनसे : १
अपक्ष : १
एकूण : १७
स्थानिक प्रश्न
- वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरा पाणीपुरवठा
- बाजारपेठेत वारंवार होणारी वाहतूक कोंडी
- आठवडे बाजारासाठी जागेची गैरसोय
- पार्किंगच्या गैरसोयीमुळे रस्त्यावरच उभी वाहने
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची अपुरी संख्या
- ऐतिहासिक तळ्याची दुरवस्था
- रस्त्यालगत कोठेही टाकला जाणारा कचरा
प्रचारातील मुख्य मुद्दे
- पाच वर्षांत झालेली विकास कामे
- आमदारांच्या माध्यमातून मिळालेला मोठ्या प्रमाणावरील निधी
- पाच वर्षांत राबविलेले सामाजिक उपक्रम
- सत्ताधाऱ्यांवर होणारे मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराचे आरोप
- विकास आराखड्याच्या माध्यमातून अनेक घटकांवर अन्याय
- काही प्रभागातील खोळंबलेली कामे
70836
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.