ज्ञानेश्वर वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. १० : पुणे जिल्हा परिषद स्थापनेपासून आजतागायत मावळ तालुक्याला अध्यक्षपद मिळालेले नाही. पण, आता तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रथमच मिळालेल्या एकतर्फी व देदीप्यमान यशाच्या पार्श्वभूमीवर यावेळी हे पद मावळ तालुक्याला मिळण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून पूर्वीची एकत्रित काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या पदांसाठी पूर्वी आरक्षण नव्हते. त्यामुळे या पदांसाठी कायम राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यांना व प्रस्थापित घराण्यांना झुकते माप मिळायचे. तत्कालीन काँग्रेसमध्ये मावळ तालुक्यातून तत्कालीन मंत्री मदन बाफना, माजी आमदार रघुनाथराव सातकर, एकनाथराव ढमाले, दादासाहेब ढोरे, दिलीप टाटिया, चंद्रकांत सातकर आदींनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले.
दादा सातकर व अण्णा ढमाले हे तर वीस वर्षांहून अधिक काळ सदस्य राहिले. त्यांना पंचायत समिती सभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली. मात्र, टाटिया वगळता इतरांना जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाची संधी मिळाली नाही. टाटिया यांना १९९७ मध्ये बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर जिल्हा परिषदेच्या पदाला आरक्षण लागू झाल्यानंतर इतर तालुक्यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली.
‘‘मावळातून तुम्ही जास्तीत जास्त सदस्य निवडून द्या. तुम्हाला जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे पद देतो,’’ अशी ग्वाही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील प्रचार सभांतून अनेकदा दिली होती. त्यानुसार त्यांनी २०१४ मध्ये टाकवे बुद्रुक-वडेश्वर गटातील सदस्य आतिश परदेशी यांना समाज कल्याण समितीचे सभापतिपद; तर २०२० मध्ये वडगाव-खडकाळा गटातील पक्षाचे सहयोगी सदस्य बाबूराव वायकर यांना कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. मात्र, जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत तालुक्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी मिळालेली नाही. तर, १९९२ पासून एक पंचवार्षिक आणि चार वर्षांचा प्रशासकीय राजवटीचा कार्यकाळ वगळता सुमारे पंचवीस वर्षे मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता राहिली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष
जिल्हा परिषदेत मात्र दोन्ही पक्षांना संमिश्र यश मिळत होते. या वेळी मात्र आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्वच्या सर्व पंधरा जागांवर विजय प्राप्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही कामगिरी पाहून अजित पवार यांना नक्कीच आनंद झाला असता व त्यांनी या कामगिरीची शाबासकी म्हणून तालुक्याला जिल्हा परिषदेतील मोठ्या पदासाठी आश्वासित केले असते. आता पक्षाचे इतर वरिष्ठ नेते तालुक्याची इच्छा पूर्ण करणार का? याबाबत मोठी उत्सुकता आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रथमच मिळालेल्या या एकतर्फी व देदीप्यमान यशाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद मिळण्याची मोठी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
आमदार शेळके यांचेही सुतोवाच
आमदार सुनील शेळके यांनीही सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना तालुक्याला जिल्हा परिषदेतील मोठी पदे मिळविण्याबाबत सुतोवाच केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच तालुक्यातील सर्व जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपद तसेच इतर समित्यांची सभापतिपदे मिळावीत, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
PNE26V94565
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.