वडगाव मावळ, ता. २५ : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष रघुनाथ जाधव यांची ११ विरुद्ध ७ मतांनी निवड झाली. पक्षाकडे बहुमत असतानाही मते फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे उमेदवार विलास बबन मानकर यांची बिनविरोध निवड झाली. सभापतिपदावर अनपेक्षितपणे मिळालेल्या विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे यापूर्वीचे सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांनी राजीनामे दिले होते. त्या पदांच्या निवडीसाठी वडगाव येथील सहकार उपनिबंधक कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. माजी सभापती संभाजी शिंदे, माजी उपसभापती नामदेव शेलार यांच्यासह सुभाष जाधव, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, शिवाजी असवले, विक्रम कलावडे, विलास मालपोटे, विलास मानकर, बंडू घोजगे, साईनाथ मांडेकर, नथुराम वाघमारे, सुप्रिया मालपोटे, अंजली जांभूळकर, अमोल मोकाशी, भरत टकले, नामदेव कोंडे, शंकर वाजे हे सर्व संचालक उपस्थित होते.
सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून विक्रम कलावडे तर भाजपकडून सुभाष जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. गुप्त पद्धतीने घेतलेल्या मतदानात जाधव यांना ११ तर कलावडे यांना ७ मते मिळाली. सुभाष जाधव यांची चार मतांनी सभापतीपदी निवड झाली. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून विलास मानकर तर भाजपकडून साईनाथ मांडेकर यांनी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत मांडेकर यांनी माघार घेतल्याने मानकर यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांनी केली. सहाय्यक अधिकारी राजेश निखारे, सचिव मंगेश घारे उपस्थित होते. निवडीनंतर भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, अरुण चव्हाण, अशोक मानकर आदींच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला. वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व सर्व संचालकांना विश्वासात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय नवनिर्वाचित सभापती सुभाष जाधव यांनी व्यक्त केला.
बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव
मावळ तालुका कृषी उत्पन्न समितीचे १८ संचालक असून, त्यात राष्ट्रवादीचे बारा, भाजपचे पाच व काँग्रेसचा एक असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. पक्षाची चार ते पाच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे उर्वरित काळात सर्व संचालकांना प्रत्येकी दोन ते तीन महिन्यांसाठी सभापती व उपसभापती पदाची संधी देण्याचा निर्णय सर्व संचालकांच्या बैठकीत झाला होता. त्यासाठी लॉटरी पद्धतीने चिठ्ठ्या काढून उमेदवार निवडण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, नंतर पक्षाकडे बहुमत असल्याने भाजपला बाजूला ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला व प्रथम सभापती पदासाठी विक्रम कलावडे व उपसभापती पदासाठी विलास मानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार या दोघांनी अर्ज दाखल केले. दुसरीकडे भाजपनेही या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटल्याने भाजप उमेदवार सुभाष जाधव यांनी कलावडे यांचा चार मतांनी पराभव केला व सभापती पदाला गवसणी घातली. उर्वरित काळात सर्वांना पदाची संधी देण्याच्या नेत्यांच्या फॉर्म्युल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काही संचालकांनी वाटण्याच्या अक्षदा लावल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे बहुमत नसतानाही अनपेक्षित पक्षाला मिळालेल्या सभापती पदांमुळे भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर हे पद पक्षाकडे आल्याने भाजप कार्यकर्त्यांना हुरूप आला आहे. दुसरीकडे, मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापती व उपसभापती निवडणुकी पाठोपाठ बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा झटका बसला आहे.
सुभाष जाधव
विलास मानकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.