वडगाव मावळ, ता. १० : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ पर्यावरण पूरक व नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव हा माझी वसुंधरा अभियान व महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरे अधिनियमानुसार पर्यावरण पूरक व नियमांचे पालन करून साजरा करण्याच्या अनुषंगाने वडगाव नगरपंचायतीने मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पात्र गणेश मंडळानी ganeshostav.pldmka.co.in या संकेतस्थळावर विहित वेळेत अर्ज सादर करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. सर्व गणेशोत्सव मंडळानी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, आवाहन नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
मार्गदर्शक तत्त्वे व नियम
- नगरपंचायत आयोजित पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा
- मंडप/स्टेज उभारणीसाठी नगरपंचायतची परवानगी घ्यावी
- स्थानिक पोलिस स्टेशनचा ना हरकत दाखला घ्यावा
- गणेशोत्सव शहर स्वच्छता, वृक्षारोपण, प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र, आरोग्य शिबिर असे उपक्रमाद्वारे करावा
- रस्त्यावर व पदपथावर तात्पुरता मंडप/स्टेज उभारल्यानंतर वाहतूक सुरळीत राहील व नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी
- मंडप/स्टेज उभारतांना रस्त्याचे खोदकाम करता येणार नाही
- कमान उभारल्यामुळे वाहतुकीस व नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होईल. अशा रितीने कमान उभारता येणार नाही
- लाऊड स्पिकरसाठी स्थानिक पोलिस विभागाकडून स्वतंत्र परवानगी घ्यावी
- मंडप/स्टेजच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाकडून नियमानुसार विद्युत जोडणी घेण्यात यावी. विद्युत पुरवठा घेताना वायरिंगमध्ये जोड खुला राहणार नाही. या साठी सर्व विद्युत कामे परवानाधारक ठेकेदारामार्फत योग्य प्रकारे करावीत
- मंडप/स्टेजच्या ठिकाणी आग प्रतिबंधक साधने, प्रथमोपचाराची साधने तत्काळ उपलब्ध होतील, अशा प्रकारे मंडपा लगत ठेवावीत
- मंडपातील देखावा बंद स्वरूपाचा असल्यास नागरिकांना अत्यावश्यक वेळी बाहेर जाण्यासाठी सुटसुटीत मोकळा मार्ग ठेवावा
- मंडप/स्टेज उभारतांना अग्निशमनदलाची वाहने अत्यावश्यक घटनेच्या वेळी मंडपाजवळ जाऊ शकतील अशा प्रकारे मोकळी जागा ठेवावी
- मंडप व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा
- मंडप/स्टेज वर कोणत्याही जातीय/धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे आक्षेपार्ह बॅनर, देखावे किंवा फलक लावू नयेत
- ध्वनिप्रदूषण विषयक कोणत्याही बाबींचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी
- पोलिस विभागामार्फत ठरवून दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे
- गणेशमूर्ती नगरपंचायत गणेशमूर्ती संकलन केंद्रावर दान करण्यात यावी
- पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यात यावे
- सजावट केवळ इको फ्रेंडली सामग्री पासून करण्यात यावी
- गणेश मूर्ती केवळ शाडू माती, शेतमाती किंवा नैसर्गिक मातीचीच असावी
- थर्माकोल व एकेरी वापराचे प्लास्टिक (सिंगल युज प्लास्टिक) वापरण्यास सक्त मनाई असेल
- सजावटीसाठी प्लॅस्टिकचा वापर टाळावा
- निर्माल्य नगरपंचायत निर्माल्य रथ मध्ये टाकण्यात यावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.