वडगाव मावळ, ता. १३ : पाश्चिमात्य संस्कृतीच्या आहारी गेल्याने आपल्या महान संस्कृतीचा विसर पडला आहे. आपली संस्कृती व धर्माचा होत असलेला ऱ्हास थांबला नाही, तर येणारा काळ कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्कृती रक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून देण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन पुण्यातील रणरागिणी महिला विचार मंचाच्या अध्यक्षा उज्वला गौड यांनी केले.
मावळ विचार मंचाने नवरात्रीनिमित्त आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर होत्या. प्रमुख पाहुणे उद्योजक दिलीप सोनिगरा, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, यावर्षीचे अध्यक्ष अरुण वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
गौड म्हणाल्या, ‘‘पूर्वीची स्त्री चूल आणि मूल या संकल्पनेत वावरत असतानाही तिच्याकडून संस्कृतीचे जतन होत होते. मुलांवर चांगले संस्कार होत होते. ती मुलांना महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत होती. सद्यःस्थितीत मुलगी मोबाइलमध्ये व आई रिमोटमध्ये अडकल्याने संवाद होत नाही. विशेषता कोरोनापासून कुटुंबातील नात्यांमधील संवाद तुटला आहे. कोरोनात ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल लहान मुलांच्या हातात गेला. तेव्हापासून ती मोबाइलच्या हातातील खेळणे झाली आहेत. तो मुलांना ऑपरेट करतो इतकी त्यांची बुद्धी कमकुवत झाली आहे. सोशल मीडियाचा वापर प्रगती करण्यासाठी होणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यःस्थितीत ८० टक्के वापर पूर्णपणे चुकला असून, २० टक्के वापर योग्य ठिकाणी होत आहे. मुले अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबतीत अडकली आहेत. मैदानी खेळ विसरली आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून आत्महत्या होत आहेत. व्याख्यानमालेसारख्या उपक्रमात शाळकरी मुलांना सहभागी करून हा संवाद प्रस्थापित करण्याची गरज आहे. आपल्यासारखी जगात दुसरी संस्कृती नाही. ती टिकविणे ही काळाची गरज आहे. अर्चना म्हाळसकर, किरण भिलारे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुदवडी येथील राष्ट्रीय खेळाडू सेजल मोईकर हिला क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गणेश विनोदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विजय जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.