बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ९ : उद्योगनगरीलगतच्या जगविख्यात हिंजवडी आयटी पार्कला ये-जा करण्यासाठी पिंपरी चिंचवड वासियांसाठी डांगे चौक ते हिंजवडी हा एकमेव प्रमुख रस्ता आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. रस्ता रुंदीकरणाचेही भिजत घोंगडे कायम असल्याने लाखो वाहन चालकांना दररोज मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमणे हटवून रुंदीकरण करण्याऐवजी महापालिका अधिकारी केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडत आहेत.
डांगे चौक ते हिंजवडीच्या शिवाजी चौकापर्यंत सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे सरसकट ४५ मीटर रुंदीकरण होणे अपेक्षित आहे. महापालिकेचा प्रकल्प विभाग सुमारे साडेचार किमी तर एमआयडीसी आठशे मीटर रस्ता करत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी भूसंपादन रखडल्याने रस्त्याचे काम जागोजागी लटकले आहे. परिणामी, रस्ता लहान - मोठा झाला असून वाहतूक कोंडीचे अनेक टप्पे रस्त्यावर तयार झाले आहेत. राजीव गांधी तंत्रज्ञान नगरीत पिंपरी चिंचवड शहरातील हजारो नोकरदार काम करतात. मात्र, ये-जा करताना सकाळी आणि सायंकाळी या सर्वांना मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागते. वाहतूक कोंडीमुळे आयटी अभियंते, कर्मचारी व विद्यार्थ्यांनाही तास न तास रस्त्यात अडकून पडावे लागते.
काय करायला हवे ?
- काळाखडक झोपडपट्टीचे रस्त्यातील अतिक्रमणे हटविणे
- अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणे
- हिंजवडीतील भटेवरानगरच्या अलीकडेपासून शिवाजी चौकापर्यंत जागेचे त्वरित भूसंपादन करणे
- काळाखडक टीव्हीएस शोरूम समोरील व अन्य दोन ठिकाणी जागा ताब्यात घेणे
- अतिक्रमणे हटवून व जागा ताब्यात घेऊन तत्काळ रस्ता रुंदीकरण करणे
रस्त्याचे बहुतेक काम महापालिकेने पूर्ण केले आहे. काही ठिकाणच्या जागा मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्याशी योग्य समन्वय साधून तडजोडणीने हा विषय सोडवण्याचा नगररचना विभागाचा प्रयत्न आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून भूसंपादन प्रक्रियेचे काम प्रगतीपथावर आहे. तर रस्त्यातील झोपड्यांबाबत झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभाग कार्यवाही करत आहे.
- प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग
डांगे चौक ते हिंजवडी रस्त्याच्या रुंदीकरणात काळाखडक झोपडपट्टीची अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या आधीही आम्ही रहिवाशांना नोटिसा बजावून पुरेसा वेळ दिला होता. परवा देखील सुमारे शंभरहून अधिक झोपडीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. वाहतूक विभागाशी समन्वय साधून पोलिस बंदोबस्तात लवकरच ही बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई हाती घेण्यात येईल.
- अण्णा बोदडे, उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन
सहापदरी रस्त्याचे नियोजन...
डांगे चौक ते हिंजवडी हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित होता. तो नुकताच एमआयडीसीकडे वर्ग झाला असून शिवाजी चौकापासून पुढे कस्तुरी चौकाच्या अलीकडेपर्यंत आठशे मीटरपर्यंत सहा पदरी रस्ता आम्ही करणार आहोत. त्याच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर हा रस्ता करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एमआयडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
चंद्रमाऊली चौकातील बेशिस्त पार्किंग...
भूमकर चौक भुयारी मार्ग ते मोरया जिमच्या अलीकडेपर्यंत मुख्य रस्त्यावरच काळाखडक वासीयांनी बेसुमार अतिक्रमणे करून अर्धा रस्ता व्यापल्याने वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यातच येथील चंद्र माऊली गार्डन चौकात चहुबाजूने गॅरेज, हॉटेल व विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणांबरोबर बेशिस्त पार्किंगने रस्ता व्यापला आहे. त्यामुळे रस्ता अतिशय निमुळता झाला आहे. मात्र तेथे वाहतूक पोलिस अजिबात फिरत नाहीत. जेथे गरज नाही तेथे पोलिस कारवाई करताना दिसत आहेत.
PNE25V05033
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.