हिंजवडी, ता. १९ : अवजड वाहनांना बंदी घालून प्रत्युष्यासारख्या अनेक निष्पापांचा बळी घेणे थांबवा, अशी मागणी करत मृत प्रत्युष्याच्या आई-वडिलांसह हिंजवडीतील जॉय विले सोसायटीच्या हजारो रहिवाशांनी सलग दोन दिवस कॅन्डल मार्च काढत निषेध आंदोलन केले. तसेच संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
आठवडाभरापूर्वी पाचवीत शिकणारी प्रत्युष्या आई वैशालीसमवेत लाडक्या बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी निघाली होती. तिच्या आत्याची वाट बघत दोघी थांबल्या असताना भरधाव डंपरने तिला चिरडले आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्दैवी घटनेमुळे आयटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेदरकर वाहनांनी प्रत्युष्यासारख्या अनेकांचे हकनाक बळी घेतले आहेत. त्याला प्रतिबंध बसावा म्हणून प्रत्युष्या राहत असलेल्या सोसायटीतील रहिवासी दुःख विसरून रस्त्यावर उतरले. सर्वांनी एकत्र येत याविरुद्ध मोहीम उघडली आहे. या आंदोलनात गेल्या काही महिन्यांत अपघातात जीव गमावलेल्यांचे आई-वडील, नातेवाईक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. प्रत्युष्याचे वडील उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत आहेत.
चालक अटकेत
हिंजवडी फेज दोन येथील इन्फोसिस सर्कलजवळ झालेल्या अपघात ११ वर्षीय प्रत्युषा संतोष बोराटे हिचा दुदैवी अंत झाला. या प्रकरणी तिच्या काकाने हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर सिमेंट मिक्सर चालक फरहान मुन्नू शेख याला अटक करण्यात आली आहे.
प्रशासन आणखी किती बळी घेणार ? याला विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. माझ्या मुलीचा अपघात नसून हत्या आहे. या विरोधात आम्ही आयटीतील रहिवाशांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. विविध मागण्या मान्य होईलपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. ऑनलाइन वोटिंग व सह्यांची मोहीमही सुरू आहे.
- संतोष बोराटे, मृत प्रत्युष्याचे वडील
WKD25A09332, WKD25A09333
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.