वाकड, ता. १० : थेरगाव, वाकड आणि हिंजवडी या उपनगरांमधील पदपथ अतिक्रमणांमुळे बळकावले गेले आहेत. या नागरी सुविधा व्यावसायिकांचे भाडे तत्त्वावरील उत्पन्नाचे साधन झाले आहेत. पदपथांवरही व्यावसायिकांनी कब्जा केला असून काही ठिकाणी पदपथ भाड्याने दिले जात आहेत. यातून लाखोंची कमाई होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. पण, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या व्यक्तींना आणखी बळ मिळत आहे.
परिसरातील व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांच्या पार्किंगसाठी पदपथ वापरतात; तर भाजीपाला, फळे, पंक्चर दुरुस्ती आदी विक्रेत्यांनी टपऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरून वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत आहे. वाकड, हिंजवडी आणि थेरगाव परिसरात अनेक आयटी कंपन्या आहेत. यामुळे लोकसंख्या आणि पर्यायाने वाहनसंख्या वाढली आहे. पदपथांवर व्यावसायिक दुकाने, खाऊगल्ल्या, मोटारी दुरुस्ती, फेरीवाले आणि अनधिकृत पार्किंगमुळे पदपथांवर अतिक्रमणांचा विळखा घट्ट झाला आहे.
मालमत्ता करातून बांधलेल्या फुटपाथांचा वापर पादचाऱ्यांसाठी व्हावा, की अतिक्रमणकर्त्यांसाठी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या परिसरातील पदपथ अतिक्रमण हा केवळ वाहतूक कोंडीचा भाग नाही, तर पादचारी हक्कांचा प्रश्न आहे. महापालिका प्रशासनाने विविध शासकीय संस्थांना सोबत घेऊन दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पदपथांवर अतिक्रमणे असलेले परिसर
१. थेरगाव : डांगे चौक, १६ नंबर, गुजरनगर, पवारनगर, साईनाथनगर, थेरगाव गावठाण, आनंदवन, मंगलनगर, गणेशनगर, वाकड फाटा, डांगे चौक- वाकड रस्ता, केटीसी मॉल परिसर, फिनिक्स मॉल परिसर, शिव कॉलनी
२. वाकड : उत्कर्ष चौक, विनोदेनगर चौक, पिंक सिटी रस्ता, दत्त मंदिर रस्ता आणि इतर रस्त्यांवर व्यावसायिकांच्या साहित्यामुळे पदपथावर मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
३. हिंजवडी : सर्वच प्रमुख रस्त्यांवरच अतिक्रमणे आहेत. पदपथांवरही व्यावसायिकांनी कब्जा केला असून काही ठिकाणी पदपथ भाड्याने दिले जात आहेत.
फटाक्यांच्या दुकानांची भर
अतिक्रमण करुन थाटलेली फटाक्यांची बहुतांश दुकाने नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. काही रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात आता दिवाळीच्या काळात सुमारे पंधरा दिवस उरल्यासुरल्या जागेवर फटाक्यांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत.
वर्षभर विविध व्यवसाय
स्मार्ट सिटी अंतर्गत व अर्बन स्ट्रीट रस्ते विकसित करताना वाकड, थेरगाव परिसरात व वाकड-हिंजवडी रस्त्यावर प्रशस्त पदपथ साकारण्यात आले. मात्र, सध्या या भागांतील सर्वच पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. खेळणी व खाद्य पदार्थांच्या दुकानांपासून गणपतीचे स्टॉल्स, शेतकरी आठवडे बाजारापर्यंत या फुटपाथांचा वापर होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांचा मूळ हक्कच हिरावला गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
गृहनिर्माण संस्था महासंघाचे पत्र
पादचारी मार्गांवरील अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी या व्यावसायिकांशी नागरिकांनी व्यवहार करू नये, असे आवाहन
पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाने नागरिकांना केले आहे. तसेच प्रशासनाला पत्र लिहून पदपथ मोकळे करण्याची, गृहनिर्माण सोसायट्यांना सवलतीच्या दरात फटाक्यांची दुकाने उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त तसेच संबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व त्या-त्या प्रभागातील अतिक्रमण विभागाला कळवून तीव्र कारवाई मोहीम राबविली जाईल.
- बापू गायकवाड, सह अभियंता, शहरी दळणवळण विभाग
महापालिका व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणे म्हणजे रहिवाशांच्या सुरक्षिततेला खूले आव्हानच आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल भरल्यानंतर महापालिकेने दिलेल्या सुविधेचा असा गैरवापर होत आहे. येथील रहिवाशांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या विरोधात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
- किरण वडगामा, मुख्य प्रवर्तक, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन
त्या-त्या प्रभागातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देऊन अतिक्रमण विरोधी पथकामार्फत लवकरच कारवाई मोहीम सुरू केली जाईल. परवानगी तसेच रस्ता सोडून खाजगी जागेत आठवडे बाजार भरविण्याबाबत सक्तीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अन्यथा तेथील व्यावसायिकांवरही कारवाई होणार आहे.
- अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभाग
WKD25A09643