हिंजवडी, ता. ३० : नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार, क्लब आणि परमीट रूममध्ये आयोजित विशेष कार्यक्रमांसाठी पोलिसांनी कठोर नियमावली जारी केली. त्या अनुषंगाने मंगळवारी (ता. ३०
सायंकाळी बावधन येथील बंटारा भवनमध्ये वाकड, आयटी पार्क हिंजवडी, बावधन, रावेत आणि बावधन या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील हॉटेल-बार चालक-मालकांची बैठक घेऊन त्यांना कडक सूचना देण्यात आल्या.
यावेळी पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, नितीन फटांगरे, अनिल विभूते यांच्यासह अनेक हॉटेल चालक-मालक उपस्थित होते. वर्षाअखेरीस मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यावर भर देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ग्राहकांसाठी आयोजकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करणे आवश्यक असून, अन्यथा हॉटेल प्रशासनालाही जबाबदार धरण्यात येईल. पोलिसांनी स्पष्ट केले की, नियमभंग झाल्यास आयोजकांवर थेट कारवाई होईल आणि ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल. उत्सव साजरा करतानाही सुरक्षितता आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन हिंजवडी पोलिसांनी केले आहे.
प्रमुख सूचना
- आयोजकांनी संबंधित विभागांकडून सर्व परवाने घेऊन स्थानिक पोलिस ठाण्यात कार्यक्रमाची सविस्तर माहिती सादर करावी
- मद्यसेवा करताना ग्राहकांचा परवाना तपासावा
- अल्पवयीन ग्राहकांना मद्य देण्यास सक्त मनाई
- ग्राहकाच्या वयाची कसून खात्री करावी
- महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ३३ (अ) नुसार खाद्यगृह, परमीट रूम किंवा बिअर बारमध्ये कोणत्याही प्रकारचे नृत्य आयोजित करण्यास बंदी
- ध्वनिवर्धकाचा वापर रात्री १२ वाजेपर्यंतच करावा
- डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करून पर्यावरण कायद्याचा भंग करू नये
- अश्लील, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी लावण्यास किंवा घोषणा देण्यास मनाई
- महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षा रक्षक नेमावेत
- सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवावेत
- हाय बीम लाइट-लेझरचा वापर करण्यास बंदी
- विनापरवानगी ड्रोन उडवू नये
- अग्निसुरक्षा उपाययोजनांचे पालन बंधनकारक
---
बावधन ः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मालकांना विविध सूचना देताना पोलिस अधिकारी.