वाकड, ता. १६ : महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून राहुल कलाटे यांच्यासह भाजप पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या प्रभागात भाजपचे उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी बहुरंगी लढत असतानाही, राहुल कलाटे यांनी आपला गड राखला.
कलाटे यांच्यासह भाजप आणि आरपीआय महायुतीचे कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर विजयी झाले. याठिकाणी भाजपचे पूर्ण पॅनेल विजयी झाले आहे. विजयानंतर राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. राहुल कलाटे म्हणाले की, “प्रभाग क्रमांक २५ मधील जनतेने ठरवले होते की त्यांच्या विकासाच्या अपेक्षांना उत्तर देणाऱ्या नेतृत्वालाच साथ देणार. जनतेने दिलेला शब्द पूर्ण केला आता आम्ही दिलेले सर्व शब्द पूर्ण करणार आहोत. विकासाच्या वाटेवर एकत्र चालताना, जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची साथ हाच आपला खरा विजय आहे.”
राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाला आधी स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. परंतु; कलाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रभागातील पॅनेलचा विजय सुकर झाल्याचे उमेदवार देखील मान्य करत आहेत. स्थानिक पातळीवर राम वाकडकर यांनी यापूर्वी कलाटे यांना विरोध केला होता परंतु; आता त्यांच्या पत्नी श्रुती वाकडकर देखील निवडून आल्या आहेत. याठिकाणी एकप्रकारे स्थानिक भाजप नेतृत्वाने प्रभागातील निवडणूक कलाटेंवर सोपवली असल्याचे चित्र होते. कारण एखादा मोठा नेता किंवा आमदार या प्रभागात फिरकले नाहीत. तरी देखील राहुल कलाटे यांनी जिथे आजवर कमळ फुलले नव्हते त्या प्रभागात पक्षाला विजय मिळवून दाखवला असून, यासाठी स्थानिक पातळीवर नवनाथ ढवळे, भारती विनोदे, चेतन भुजबळ, संतोष पवार यांची साथ लाभली. मागील निवडणुकीप्रमाणे आयटीयन्स राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये कलाटेंची क्रेझ दिसून आली असून, याठिकाणी भाजपला मोठ्या संख्येने बहुमत मिळालेले दिसून येत आहे.
---
सर्व मतदार बंधू-भगिनी व मायबाप जनता, आपणा सर्वांनी, माझ्या प्रत्येक संघर्षात कायम माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून, आशीर्वादरूपी सावली माझ्यावर धरली. आपण सर्वांनी आजही तेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत ठेवत, प्रभाग क्रमांक २५ मधून हा विजय मिळवून दिला. त्यामुळे हा विजय माझा एकट्याचा नसून, आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आहे. यासाठी मी कायम आपला ऋणी असून, आपल्या सर्वांच्या स्वप्नातील प्रभाग घडविण्याचे वचन देतो.
- राहुल कलाटे, विजयी उमेदवार, भाजप, प्रभाग क्र. २५
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.