वाकड, ता.१९ : गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत वाकड परिसरातील सेवा रस्त्यांचे काम संथगतीने सुरू असताना आता कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमार दर्जाचे काम आणि साहित्य देखील तकलादू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. मात्र, खोदलेले रस्ते महिनो न महिने तसेच पडून असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे आणि उंचवट्यांचा अंदाज न आल्याने या रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरू आहे.
करपेनगर परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. मात्र, मुख्य प्रवेशद्वाराच खोदण्यात आल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. महिला, लहान मुले व ज्येष्ठांना धोका पत्करुन ये-जा करावी लागत आहे.
वाहतूक कोंडी होऊन धुळीचे लोट उठत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिला गंभीर जखमी
गेल्या आठवड्यात येथील खड्ड्यात पडून एक महिला गंभीर जखमी झाली. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भुजबळ चौक, वाकड फाटा, भुमकर चौक, करपेनगर आणि सेवा रस्त्यांवरील आंतरजोडणी मार्गांवर दररोज सकाळ-सायंकाळ मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सेवा रस्ते अर्धवट अवस्थेत असल्याने स्थानिक वाहतूक मुख्य महामार्गावर येते आणि त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. खोदकामानंतर योग्य ती सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा प्रकाश योजना नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी खड्डे न दिसल्याने वाहन घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
काही महिन्यांपूर्वी कोणताही मोबदला न घेता केवळ ‘अ-ब’ पत्र देत जागामालकांनी जागा ताब्यात दिल्या. मात्र, सध्या काम अतिशय संथ गतीने व सुमार दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिक करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील वर्दळ पाहता दर्जेदार कामासाह त्यास गती देणे अत्यावश्यक आहे.
- राहुल कलाटे, नगरसेवक
पुढील ५० वर्षांचा विचार करुन प्रशस्त व आधुनिक रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी काही निधी महापालिका व काही निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खर्च करणार आहे. मात्र, रस्त्यातील भूमिगत केबल्स आणि सेवा वाहिन्या हलविण्यास विलंब झाला आहे. त्यात निवडणुका लागल्या. त्यामुळे काम थांबले. काही तांत्रिक बाबी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यानंतर युद्ध पातळीवर काम सुरू होईल.
- विनोद पाटील, समन्वयक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
97160
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.