हिंजवडी, ता. २५ : हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मारुंजी, नेरे, कासारसाई या भागांतील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून सीएनजी मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेकदा तासनतास रांगेत थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
हिंजवडी-कासारसाई मार्गावरील दोन पंपांवर गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून सीएनजीची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे कासारसाई, नेरे, जांबे, मारुंजी तसेच मावळ तालुक्याच्या काही भागातील वाहनचालकांना मोठा आधार होता. जाण्या-येण्याच्या वाटेत सीएनजी मिळत असल्याने मोठा दिलासा होता. विशेषतः या दोन्ही पंपांवर ऑनलाइन सीएनजी सुविधा असल्याने ग्राहक समाधानी होते. मात्र, मागील महिनाभरापासून या पंपांवर ‘सीएनजी संपले आहे’ असे फलक वारंवार झळकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
कासारसाई येथील शितोळे पेट्रोलियम येथे नुकतीच सीएनजीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु ही सुविधा ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध असल्याने येथेही वारंवार सीएनजी संपत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे स्थानिक ग्राहकांची गैरसोय कायम आहे. सीएनजीसाठी पर्याय नसल्याने अनेक वाहनचालकांना वाकड किंवा हिंजवडी येथील इतर पंपांवर जावे लागत आहे. हे अंतर जास्त असल्याने वेळ आणि इंधन दोन्हीचा अपव्यय होत आहे.
अपुऱ्या दाबाने नुकसान
काही वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, केवळ सीएनजी भरण्यासाठी जाण्या-येण्यातच सुमारे एक किलो सीएनजी खर्च होते. शिवाय, अनेकदा पंपांवर योग्य दाबाने सीएनजी मिळत नसल्याने वाहनचालकांचे अतिरिक्त नुकसान होत आहे. नागरिक आणि वाहनचालक संबंधित पेट्रोलियम कंपन्या व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच हिंजवडी परिसरातील सीएनजी पुरवठा पूर्ववत आणि सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी करत आहेत.
सीएनजी पूर्णपणे विस्कळीत झाल्याने मोठी अडचण होत आहे. यामुळे चारचाकी सीएनजी धारक वाहनचालक मोठ्या अडचणीत आले आहेत. यामुळे अनेक वाहन चालकांना हिंजवडीमध्ये सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. तिथे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे वेळ आणि पैसे वाया जातात.
- शिवाजी भागवत, सीएनजी वाहन चालक
आमच्या सीएनजी मशीनमधील एक सुटा भाग निकामी झाल्याने आमचा सीएनजी पुरवठा बंद आहे. तो सुटा भाग मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने अद्याप सीएनजी चालू झाला नाही. लवकरात लवकर पुरवठा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
- राहुल जाधव, पेट्रोल पंप मालक, नेरे
नागरिकांच्या मागण्या
- बंद किंवा विस्कळीत सीएनजी सेवा तातडीने सुरू करावी
- ऑनलाइन सीएनजी पुरवठा पुन्हा नियमित करावा
- ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा
- पंपांवर योग्य दाबाने सीएनजी उपलब्ध करून द्यावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.