लेखक- युवराज माने
आघाडीच्या ओटीटी माध्यमांमध्ये मराठी भाषेतील वेबसीरिजचं अस्तित्व नगण्य आहे. यावर्षी ‘सोनी लिव’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या ‘लंपन’ या वेबसीरिजने मराठी भाषेतही उत्तम दर्जाची निर्मिती होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळू शकतो हे दाखवून दिलं होतं. ‘सोनी लिव’ने आता पुन्हा एकदा मराठी भाषेतील ‘मानवत मर्डर्स’ ही वेबसीरिज प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. सत्तरच्या दशकात उभा महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या खळबळजनक मानवत हत्याकांडावर ही सीरिज आधारित आहे. या हत्याकांडाच्या मुळाशी जाऊन त्याचं गूढ उकलणारे पोलिस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ क्राइम’ या पुस्तकाचा आधार घेऊन गिरीश जयंत जोशी यांनी सीरिजचं लेखन केलं आहे.
सामाजिक व्यवस्थेवर व्यंगात्मक भाष्य करणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आशीष अविनाश बेंडे यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तांत्रिकदृष्ट्या सीरिजची कामगिरी उत्तम झाली आहे. खासकरून बबन अडगळे यांचं प्रॉडक्शन डिझाइन सत्तरच्या दशकाला जिवंत करण्यात यशस्वी ठरलं आहे. वाड्याचा अंतर्गत परिसर असो, शाळेतील वर्ग असो, सरकारी विश्रांतीगृह असो किंवा ‘मानवत’चे पोलिस स्टेशन असो, या सर्वच ठिकाणांचे कलादिग्दर्शन उल्लेखनीय आहे.
सत्यजित शोभा श्रीराम यांचं छायाचित्रण गावातील तणावाला अधोरेखित करतं. खासकरून रात्रीच्या प्रसंगांची प्रकाशयोजना लक्षणीय आहे. सीरिजची आणखी एक खासियत म्हणजे सीरिजचा लक्षवेधी टायटल सिक्वेन्स. सचिन सुरेश गुरव आणि किरण देशमुख यांनी रचलेले गूढ ॲनिमेशन आणि त्याला साथ देणारे साकेत कानेटकर यांचे थरारक पार्श्वसंगीत एकत्रितरीत्या अपेक्षित परिणाम साधते. विशेष म्हणजे, ‘सोनी लिव’च्याच ‘लंपन’ या मराठी सीरिजचेही टायटल ॲनिमेशन आणि पार्श्वसंगीत त्या विषयाला अगदी साजेसे होते. त्यामुळे अशा बारकाव्यासह काम करणारी ‘सोनी लिव’ची टीमही त्यासाठी कौतुकास पात्र आहे.
सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि मकरंद अनासपुरे या कसलेल्या अभिनेत्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे वठवल्या आहेत. याशिवाय युगांधर देशपांडे यांनी सीरिजमधील इतर महत्त्वाच्या भूमिकांसाठी उत्तम अभिनेते निवडले आहेत. खासकरून शुक्लाच्या भूमिकेतील शार्दूल सराफ, नवाथेच्या भूमिकेतील पूर्णानंद वांढेकर आणि अंबादासच्या भूमिकेतील सागर यादव यांनी आपल्या व्यक्तिरेखांचे तपशील कथानकात सादर करताना लक्षवेधी कामगिरी केली आहे.
आशुतोष गोवारीकर यांनी रमाकांत कुलकर्णी ही ‘मानवत मर्डर्स’ची सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे. यात त्यांचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येत असला तरी या भूमिकेची लय त्यांना पकडता आलेली नाही. ‘लगान’, ‘स्वदेस’ अशा उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शक असणाऱ्या गोवारीकरांना येथील अभिनयाचा प्रांत फारसा मानवलेला नाही. उदाहरणार्थ बन्सी वाळके, काचू पाकू, गणपत साळवे यांचा जबाब घेत असताना गोवारीकरांचे हावभाव सारखेच निर्विकार राहतात. अशाच गुन्हेगारीविषयक तपासावर आधारित असणाऱ्या ‘दिल्ली क्राइम’मधील शेफाली शाह आणि ‘कोहरा’मधील सुविंदर विकी या अभिनेत्यांनी साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता आणि तत्परता या दोन्हींची याठिकाणी उणीव जाणवते. ‘मानवत’मध्ये घडणाऱ्या अमानुष गुन्ह्याचा तपास पुरेसा उत्कंठावर्धक नसणे हा सीरिजचा आणखी एक दोष म्हणता येईल.
प्रेक्षकांना सीरिज बघताना हा तपास अगदीच सुस्तपणे सुरू असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात पुरेशी उत्सुकता निर्माण होत नाही. पटकथेतील सूक्ष्म संदर्भ, व्यक्तिरेखांचे सविस्तर कथाप्रवास आणि विविध नातेसंबंधातील गुंतागुंत तपशीलवार दाखवण्यात सीरिजला अपयश येतं. उत्तम साहित्यकृती, चांगले अभिनेते, कुशल तंत्रज्ञ, कल्पक दिग्दर्शक आणि इतर संसाधनांची कमतरता नसतानाही मराठी भाषेतील कथानकांना ओटीटी माध्यमांमध्ये स्थान मिळत नव्हतं. ‘सोनी लिव’सारख्या मोठ्या माध्यमाने एकाच वर्षात दोन मराठी वेबसीरिज प्रदर्शित करून याची सुरुवात करणे ही मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे भाषा सेटिंगमध्ये मराठी भाषेचा पर्याय निवडून ही सीरिज आपल्या भाषेतच पाहणे ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.