Share Market
Share Market Esakal
प्रीमियम अर्थ

Share Market: तुम्ही गुंतवणूकदार आहात की अल्प मुदतीचे ट्रेडर्स? त्यानुसार करा शेअर्सची निवड

साप्ताहिक टीम

भूषण महाजन

गेल्या सप्ताहाच्या शेअर बाजाराची वाटचाल बघून आपसूकच आरपारमधील बाबूजी धीरे चलना .... हे धुंद गीत ओठावर येते. त्यात नृत्यांगना शकीला, गुरुदत्तला बघून म्हणते आहे :

बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा सम्भलना

हाँ बडे़ धोखे हैं, इस राह में

वरील गीतात ‘प्यार’ ऐवजी ‘बजार’ टाकले तर ते शेअर बाजाराला तंतोतंत लागू पडते. निफ्टी वर जाते पण मला तोटा का होतो, ही हृदयाला भिडणारी तक्रार ऐकताना गीताच्या पुढील ओळी ओठावर येतात

क्यूँ हो खोये हुये सर झुकाये

जैसे जाते हो सब कुछ लुट़ाये

ये तो बाबूजी पहला कदम हैं

नजर आते हैं अपने पराये

मित्रहो, जोखीम जोखीम म्हणतात ती हीच बरं का!!! प्रेमात असो वा शेअर बाजारात आपली निवड चुकली, की दु:ख ठरलेलेच. त्यात मार्केटची दिशा सतत बदलत असेल तर निवड करणार तरी कशी? आता हेच पहा, फेब्रुवारीच्या १९ तारखेला शेअर बाजार वर जाऊन २२१९६ अंशावर पोहोचला. दुसऱ्याच दिवशी त्याच्याही वर उघडून चक्क दोनशे अंश खाली निफ्टी बंद झाली. मंदी सुरू झाली म्हणावे तर तिसऱ्या दिवशी बाजार पुन्हा वर, लागलीच चौथ्या पाचव्या दिवशी पुन्हा खाली. निफ्टीचा आठवड्याचा बंद तरीही २२१२२ झाला, एव्हढेच काय ते समाधान! पुन्हा गोंधळात टाकणे चालूच! उगाच नाही आलेखकर्ते अशा गोंधळाबद्दल काही शेलके शब्द वापरत! असो.

थोडक्यात काय निफ्टी टाइमपास करतेय. तिला वरच जायचंय पण तेजीवाल्यांना आणि मंदीवाल्यांना दोहोंनाही हुलकावणी देणे चालू आहे. आमच्याकडे यावर एक सोपा पण आचरणात आणायला कठीण असा एक उपाय आहे.

प्रथम आपण कोण आहोत ते ठरवणे. गुंतवणूकदार की अल्प मुदतीचा ट्रेडर ?

हे ठरल्यावर प्रथम तेजीतले शेअर व मंदीतले शेअर यांची वेगवेगळी यादी करणे. ती कुठल्याही पिंक पेपरमध्ये मिळते. शेअर कितीही तेजीत असला तरी बाजार बंद होता होता नफावसुली होऊन तो थोडा खाली येतोच.

एक नजर त्या शेअरच्या इतिहासाकडे टाकून किमान तो ‘ड’ दर्जाचा नाही ह्याची खात्री करून घ्यावी. पुस्तकी किंमत दर्शनी किमती एव्हढी तरी किंवा त्यावर आहे व कंपनी नफा करतेय इतके जरी बघितले तरी पुरे. ही सर्व माहिती देणारी अनेक संकेतस्थळे आहेत.

शेअर बाजार खाली असतानाच व आपण निवडलेला तेजीतला शेअर खाली असतानाच तो खरेदी करणे, तसेच विक्री करताना याउलट बघणे.

आपण ट्रेडर असलो तर मंदीतले शेअर मूलभूत दृष्टिकोनातून कितीही आकर्षक वाटले तरी त्यांच्या वाटेला जाऊ नये. उदाहरणार्थ एशियन पेंट, एचडीएफसी बँक, कोटक बँक वगैरे वगैरे शेअर खूप छान आहेत पण ते आपल्यासाठी नाहीत. (इदं न मम) ते काम लांब पल्ल्याच्या गुंतवणूकदाराचे! (कारण आज मंदीत असलेला खानदानी शेअर पुढे कधीतरी तेजीत येतोच).

ट्रेडर जरी असलो तरी शेअरची डिलिव्हरी घेण्याची तयारी ठेवावी. अल्पकाळ सांभाळून नफ्यातच विकायचे असे ठरवून टाकावे.

इतकी काळजी घेऊनही आपली निवड चुकलीच तर खजील न होता ५-७ टक्क्यांचा स्टॉप लॉस करावा आणि नव्याने निवड करावी. (प्रेमातल्या एखाद्या ब्रेकअपला न घाबरता जसे नवे नाते जोडतो, तसे)

बाजाराच्या या पातळीवर डेरिव्हेटिव्ह बाजाराकडे ढुंकूनही बघू नये. हा काळ डेअरिंग करण्याचा नाहीच! वरील गाणे सतत गुणगुणत राहावे.

इतरही अनेक सूचना देता येतील पण तो या लेखाचा विषय नाही.

बाजारातल्या कसलेल्या ‘मंजा हुवा खिलाडी’ या संज्ञेस पोचलेल्या ट्रेडरला वरील अभ्यास बालवाडीचा वाटेल. त्यात आजकाल आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेऊन अल्गो ट्रेडिंग करणारे महाभाग वरील सूचना बघून खदाखदा हसतील.

त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नये, कारण भांडवल तुमचे आहे. पुढील तीन ते पाच वर्षाचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्याला सारे कसे सोपे आहे. आज खाली असलेले पण चांगल्या व्यवस्थापनाचे शेअर घ्यावे व सांभाळावे.

त्याखेरीज एखादा चांगला शेअर तात्पुरत्या वाईट बातमीने खाली आल्यास त्याचे भविष्य काय असू शकेल ह्याचा अंदाज बांधून तोही नक्की संग्रही ठेवावा. पुढील तीन ते पाच वर्षात निफ्टी ३३००० व सेन्सेक्स १,००,००० ही पातळी पार करेलच, असा ठाम विश्वास ठेऊनच हे करायचे आहे.

असा कुठलाही शेअर नजरेत येत नसेल तर चक्क ठेव बाजाराचा आश्रय घ्यावा किंवा म्युच्युअल फंडाला शरण जावे. निफ्टी अल्पकाळात ह्यापुढे ५ ते ७ टक्के वर जाऊ शकते व तितकीच खालीही येऊ शकते. (७ टक्क्यांऐवजी निफ्टी १५ टक्के वर गेली अथवा खाली गेली तरी आपली हरकत नसावी) अशा वेळी हायब्रीड फंडाची कास धरावी.

मागे ह्या लेखमालेत मल्टी अॅसेट फंडदेखील सुचवले आहेत. मालमत्तेचे विभाजन व नियोजन करताना किमान २० ते ३० टक्के भांडवल, जोखीम कमी करण्यासाठी फिक्स्ड इन्कम अथवा हायब्रीड फंडात आपापल्या जोखीमक्षमतेप्रमाणे टाकावे.

कुठल्याही कारणाने बाजार खाली आल्यास वरील बाजूला ठेवलेले भांडवल कामी येईल. आजच्या भावात दीर्घ ड्यूरेशन असलेले गिल्ट फंडदेखील चांगला परतावा देतील

थोडक्यात आजचा काळ सावध आशावाद बाळगण्याचा आहे.

स्मॉल व मिडकॅप शेअरमधील वारेमाप तेजी आता सेबीच्या डोळ्यात खुपू लागली आहे. सीपचा बेभान ओघ याच प्रतवारीकडे येतोय. अशा वेळी या प्रतवारीतील म्युच्युअल फंडांची (प्रामुख्याने स्मॉल कॅप फंड) स्ट्रेस टेस्ट घ्यावी का, यावर सेबी विचार करीत आहे.

आपण हृदय विकाराची तक्रार करतो तेव्हा करावी लागते तशी. अचानक ५ ते १५ टक्के शेअर बाजार घसरला तर तरलता नसल्यामुळे स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठे नुकसान होऊ शकते. (त्या बाबतीत छोटा गुंतवणूकदार अनभिज्ञ आहे.) शेअरची मूलभूत कामगिरी चांगली आहे पण व्यवहार कमी होत असतील तर मोठी विक्री करणे कठीण होते. यासाठी फंडाने त्या त्या योजनेत काय पावले उचलली आहेत हे बघण्यात येईल.

स्मॉल कॅप फंडातसुद्धा २० टक्के शेअर लार्ज कॅप प्रतवारीतील घेता येतात, त्यात मोठे व्यवहार होतात व त्यातून एक गठ्ठा विमोचनाची मागणी आल्यास ती पूर्ण करता येऊ शकते, तसेच फंडात योग्य रोकड निधीचे प्रमाण ठेवल्यास त्यातूनही गुंतवणूकदारांचे भांडवल परत करता येईल. हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल सेबी टाकत आहे.

बऱ्याच स्मॉल कॅप फंडांनी आपल्याकडील येणारे भांडवल नियंत्रित केले आहे, ते फक्त सीपद्वारे घेण्यात येते, हे सुज्ञ गुंतवणूकदारांच्या ध्यानात एव्हाना आलेच असेल. म्हणजेच नियामक, गुंतवणूकदाराला व फंड व्यवस्थापकांना सजग करीत आहे हे विचारात घ्यायला हवे.

आज शेअर बाजाराच्या तेजीचे चारही एक्के गुंतवणूकदारांच्या हातात आहेत. अंतरिम अंदाजपत्रक मनाजोगे आले आहे, त्यात सरकारी भांडवल खर्च वाढीव असूनही महसुली तूट आटोक्यात आहे. सरकारची कर्ज उभारणी कमी असेल असा अंदाज आहे.

शेअर बाजाराला न रुचणारे, निवडणुकीवर डोळा ठेऊन केलेले कुठलेही लाड दिसत नाहीत. पुढे निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्ष हाच मार्ग चोखाळेल व देशाचे नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदींकडे जाईल, असे बाजाराने गृहीतच धरले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री चालूच ठेवली तर स्थानिक गुंतवणूकदार तिचा समर्थपणे समाचार घेत आहेत.

सरकारचे तसेच, बाजारात सूचीबद्ध असलेल्या व नसलेल्या उद्योगांचे, कर्जाचे प्रमाण नियंत्रित आहे व त्यामुळे होणारा नफा /देय व्याज हे गुणोत्तर समाधानकारक आहे. दूरवरचा मार्ग आकर्षक आहे व पुढील ३ ते ५ वर्षात जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था भारतीय असेल असा विश्वास ठेवता येतो.

मग बोचतंय काय? पहिल्याप्रथम भरपूर वाढलेले व प्रत्येक बातमीचा पाठलाग करत अधिक वर जाणारे शेअरचे भाव. फिनटेक कंपन्यांची शेअर बाजारात वाताहत होण्याआधी झोमॅटोचा भाव १६ नोव्हेंबर २१ रोजी ₹ १६९वर गेला होता हे विसरून चालणार नाही.

आज दोन वर्षानंतर तो भाव दिसला कारण गेल्या दोन वर्षात नफावृद्धीकडे कंपनीने दिलेले लक्ष. इन्फोएज सारख्या नोकरीच्या संकेतस्थळाच्या बाजारपेठेत सिंहाचा वाटा असलेला शेअर (एकेकाळचा आमचा आवडता असलेला) अजूनही १४ ऑक्टोबर रोजी नोंदवलेल्या ₹ ७,०००च्या भावाच्या खालीच दोन वर्ष झाली तरी घुटमळतोय.

कारण मार्केट मूड बदलला आहे. बजाज फायनान्ससारख्या उच्च गुणवत्तेच्या शेअरला देखील आज बाजार वाट्टेल तो भाव द्यायला तयार नाही.

ग्रासिमने पेंट व्यवसायात पदार्पण करायचे ठरवल्या बरोबर एशियन पेंट्सची लकाकी कमी झाली. तसेच जिओ फायनान्स येणार म्हटल्यावर, विश्लेषक बजाज फायनान्स व पूनावाला फिन्कॉर्प अधिक सूक्ष्मपणे अभ्यासू लागले.

दुसरी गोष्ट बोचतेय, ती म्हणजे शेअर बाजारात प्रचंड वाढलेले, सहज उपलब्ध असलेले लिव्हरेज. शेअर तारण, त्याजोडीला म्युच्युअल फंड तारण देऊन पैसे उभारणे सोपे आहे.

हे भांडवल पुन्हा शेअर बाजारातच येते. या जोडीला तीन लाख कोटी रुपयांवर असलेला रिटेलचा फ्युचर बाजारातील हिस्सा.

कर्ज काढून शेअर घेऊ नका, असा कितीही आक्रोश केला तरी ते करायचा मोह होतोच. शेअर बाजार अचानक खाली आला तर ही परतफेड कठीण होत राहील. त्याला मार्जिन कॉल अशी संज्ञा आहे.

ह्याचा प्रतिवाद करताना तेजी करणारे म्हणतील, की असे का होईल ते सांगा. आमचे म्हणणे असे, की कुठलेही कारण त्याला पुरेल. अगदी पुढे येणाऱ्या अंदाजपत्रकातील काही तरतुदी रुचल्या नाहीत तरी सेंटीमेंट बदलू शकते.

तात्पर्य एकच... बाबूजी धीरे चलना... पुणेरी हिंदीत त्याला पुष्टी जोडता येईल... सावध आशावाद बाळगना!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.

------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT