Anti theft feature in Car
Anti theft feature in Car  esakal
साप्ताहिक

Car Safety Feature तुमची कार चोरांपासून वाचविण्यासाठी हे करा उपाय

साप्ताहिक टीम

सागर गिरमे

‘गाडीमध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर आहेत, त्यामुळे गाडीला आता माझ्या परवानगीशिवाय दुसरे कोणी हात लावू शकत नाही, तर चालवणे दूरच राहिले..’ असाच विचार तुम्हीही करत असाल, तर वेळीच सावध व्हा.. कारण कितीही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असली तरीही ती क्रॅक करता येते, त्यामुळे आत्ता पार्किंगमध्ये उभी असणारी तुमची गाडी जरा वेळाने तिथेच असेल असे नाही. ती चोरीलाही जाऊ शकते.

वाहन क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. नव्याने येणाऱ्या गाड्यांमध्येही हे नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आता दिसू लागले आहे. सध्याच्या गाड्यांमध्ये कम्फर्ट बरोबरच विविध सुरक्षा फीचरही आहेत.

सोबतच गाड्या चोरीला जाऊ नयेत म्हणूनही अँटी थेफ्ट फीचरही मोठ्या संख्येने येत आहेत. अर्थात त्यासाठी गाडीचे टॉप एंड मॉडेल असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखी गाडी बंद पार्किंगमध्ये किंवा डोळ्यासमोर पार्क करण्याची गरज भासत नाही.

पण थांबा... तुम्ही विचार करताय तसंच प्रत्यक्षात घडतंय, असं म्हणता येणार नाही. कारण भारतामध्ये हाय एंड सिक्युरिटी गाड्याही चोरल्या जात आहेत.

हाय एंड अँटी थेफ्ट सिक्युरिटी फीचरही तोडून दरवर्षी सरासरी लाखभर गाड्या चोरल्या जातात, असे या संदर्भातील आकडेवारी सांगते. वाहन क्षेत्रातले तंत्रज्ञान बदलले तसे गाडी चोरही अपडेट झाले.

त्यामुळे आपली गाडी चोरीला जाणार नाही, असा गैरसमज बाळगणे आपल्यासाठी धोक्याचे आणि मोठ्या नुकसानीचे ठरू शकते.

तंत्रज्ञान हायटेक असले तरीही ते क्रॅक करता येत असल्याने दिल्ली, मुंबई, बंगळूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोज किमान दहा गाड्या चोरीला जातात, अशी आकडेवारी समोर आलेली आहे. त्यावरून या विषयाचे गांभीर्य सहज लक्षात येऊ शकते.

त्यामुळे अशी घटना आपल्याबाबत घडू नये, यासाठी सदैव जागरूक राहणे आवश्यकच आहे.

हाय टेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाडीचे अँटी थेफ्ट फीचर डिसेबल करणे शक्य आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या क्लृप्त्या वापरून गाडी चोरता येते.

काचेवरील बारकोड

गाडीमध्ये सेफ्टी फीचर म्हणून इममोबिलायझर सिस्टीम दिलेली असते. त्यासोबतच सध्याच्या गाड्यांच्या टॉप एंड मॉडेलमध्ये की-लेस एंट्री, पुश बटन स्टार्ट/ स्टॉप असेही फीचर असतात. या सर्व फीचरची आणि इतर उपकरणांची माहिती असलेला बारकोड गाडीच्या काचेवर चिकटवलेला असतो.

या बारकोडमध्ये गाडीच्या फीचरच्या सिक्युरिटी कोडसहीत इतर अत्यंत संवेदनशील माहितीही असते. ही माहिती गाडी तयार झाल्यापासून ती डीलरकडून ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत गरजेची असते.

मात्र गाडीचोर गाडीची माहिती असलेला हाच कोड स्कॅन करून त्यातील सिक्युरिटी कोड इतर देशांमध्ये किंवा शहरांमध्ये बसलेल्या हॅकरकडे पाठवून क्रॅक करतात किंवा ते बदलतात.

त्यामुळे सध्याच्या इंटरनेटशी जोडलेल्या अत्याधुनिक कार कोणतीही तोडफोड न करता किंवा वायर न कुरतडता अनलॉक होऊन सुरू करता येतात. या पद्धतीने चोरी केल्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी बाप-लेकाच्या एका जोडीला पकडल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती.

काय करावे?

गाडी खरेदी केल्यावर बहुतांशवेळा डीलर हा बारकोड काचेवरून काढून टाकतो. मात्र तरीही गाडीच्या काचेवर तुम्ही स्वतः न लावलेला कोणता बारकोड आहे का, ते तपासावे. असा काही बारकोड असल्यास तो त्वरित काढून टाकावा.

ओबीडीला जपा

आताच्या सर्वच गाड्यांमध्ये ओबीडी (ऑन बोर्ड डायग्नोस्टिक) पोर्ट असतो. गाडीचा परफॉर्मन्स ट्रॅक करण्यासाठी तसेच गाडीतील एखादा पार्ट खराब झाल्यास त्याची ओळख नेमकेपणाने पटवण्यासाठी एक कॉम्प्युटराईज सिस्टम या पोर्टच्या साहाय्याने लावता येते.

सिक्युरिटी कोडसहीत गाडीचा सर्व डेटा या पोर्टमध्ये समाविष्ट असतो. या पोर्टपर्यंत पोहोचल्यास अॅडव्हान्स डिव्हाईसच्या मदतीने कोड बदलून किंवा तो रिसेट करूनही गाडी सुरू करता येते.

काचा फोडून गाडी चोरीला गेल्याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील, त्या चोऱ्या अशाच पद्धतीने झालेल्या असतात.

काय करावे?

ओबीडी पोर्टचा उपयोग करून चोरी होऊ नये म्हणून हा पोर्ट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आफ्टर मार्केट प्रोटेक्टर मिळतात. ते लावल्याने पोर्टपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊन कार चोरीची शक्यता कमी होऊ शकते.

चावी/ रिमोट ठेवा सुरक्षित

आताच्या हाय एंड कार इंटरनेट कनेक्टेड आहेत. वेगवेगळ्या सेन्सरच्या माध्यमातून सिग्नल मिळाल्याने गाडीतील अनेक सिक्युरिटी, सेफ्टी फीचर कार्यरत असतात. सध्याच्या गाड्यांमध्ये की-लेस एंट्री हे फीचर सर्रास बघायला मिळते.

कम्फर्ट म्हणून हे फीचर चांगले आहे. मात्र याच फीचरचा उपयोग गाडी चोरण्यासाठीही केला जातो. गाडीच्या चावी किंवा रिमोटमध्ये (की-फोब) सेन्सर असतात. ते सेन्सर आणि गाडीतील की-लेस एंट्रीचे सेन्सर एकमेकांना सिग्नल पाठवत असतात.

सिग्नल रिलेच्या माध्यमातून हे सिग्नल मॅच झाले की गाडी अनलॉक होते. हा सिग्नल रिले अॅडव्हान्स डिव्हाईसच्या मदतीने कंट्रोल करून त्यातील सिग्नलची रेंज वाढवली जाते, त्यामुळे चावी किंवा रिमोटपर्यंत पोहोचून ते मॅच होतात आणि गाडी अनलॉक होऊन सुरूही करता येते.

काय करावे?

गाडी पार्क घरून घरी आल्यावर आपल्याला चावी एकतर दारामागे, खिडकीजवळ अडकविण्याची किंवा पॉटमध्ये ठेवण्याची सवय असते.

मात्र ही सवय बदलून चावी घरांमध्ये शक्य तेवढ्या आतील रूममध्ये किंवा अॅल्युमिनियमच्या बंद डब्यात ठेवावी. जेणेकरून रिलेतील सिग्नलची रेंज वाढवली तरी ती चावीशी कनेक्ट होऊ शकणार नाही.

क्लोनिंगची भीती

चावीमध्ये किंवा रिमोटमध्ये असलेल्या वेगवगळ्या चीप, सेन्सरकडून येणाऱ्या सिग्नलमुळे गाडी सुरू किंवा लॉक-अनलॉक करता येते. मात्र चावी किंवा रिमोट क्लोन केल्यास किंवा त्यातील चीप, सेन्सरचे प्रोग्रॅमिंग केल्यास गाडी चोरणे सहज शक्य होते.

काय करावे?

आठवून बघा, आपण अत्यंत महत्त्वाची असणारी चावी किंवा रिमोट सहजच कोणाही अनोळखी व्यक्तीच्या हाती देतो, त्यावेळी हा धोका कित्येक पटीने वाढतो. त्यामुळे स्वतःची गाडी स्वतः पार्क करा आणि चावी स्वतःजवळच ठेवा.

अलार्म, जीपीएस डीअॅक्टिव्हेशन

लॉक असताना गाडीला अनावश्यक धक्का लागला की गाडीतील अलार्म वाजू लागतात. त्यामुळे काहीतरी चुकीचे घडते आहे, हे आपल्याला लगेचच कळते.

तसेच गाडीचे लाइव्ह लोकेशन जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने आपल्याला कळत असते. मात्र अॅडव्हान्स डिव्हाईस वापरून अलार्म आणि जीपीएस ट्रॅकर डीअॅक्टिव्हेट करता येतात. असे झाल्यास गाडी सुरू न करताही टो करून चोरली जाऊ शकते.

काय करावे?

कार सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासोबतच अँटी जॅमिंग टेक्नॉलॉजी असलेले डिव्हाईस लावून घ्यावेत. ही टेक्नॉलॉजी गाडीच्या अलार्मशी होणारी छेडछाड ओळखू शकते.

त्यामुळे असा अनुचित प्रकार घडण्याआधीच अलार्म वाजायला लागतात. जीओ फेन्सिंगचा समावेश असलेले अॅडव्हान्स जीपीएस ट्रॅकर गाडीत असावेत.

जिओ फेन्सिंग अॅक्टिव्हेट असल्याने ठरावीक किलोमीटरच्या बाहेर गाडी गेल्यास लगेच आपल्याला नोटिफिकेशन मिळतात, त्यामुळे धोका टळू शकतो.

----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT