Olympic
Olympic  esakal
साप्ताहिक

Olympic :ऑलिंपिक स्पर्धेत आशियायी क्रीडा स्पर्धेपेक्षा भारताला मिळणार जास्त पदके?

Shraddha Kolekar

किशोर पेटकर

आशियाई स्पर्धेत भारताने शतकी पदकांची आस बाळगली व ती साध्य झाली. आता ऑलिंपिकमध्ये पदकतक्त्यात दुहेरी आकडा गाठण्याचे उद्दिष्ट हवे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारताने चीनमधील हांग् चौऊ येथे नोंदविली.

स्पर्धेत प्रथमच पदकांचे शतक पार झाले. २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण १०७ पदके जिंकत भारताने यजमान चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यानंतर चौथा क्रमांक मिळविला. २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला एकूण ७० पदके मिळाली होती आणि त्यापैकी १६ सुवर्णपदके होती.

शिवाय २३ रौप्य व ३१ कांस्यपदकांचाही समावेश होता. हांग् चौऊ येथील स्पर्धा सर्वार्थाने भारतासाठी विलक्षण ठरली. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या तिन्ही प्रकाराच्या पदकांत भारतीयांची लक्षणीय प्रगती पाहायला मिळाली.

जकार्ता येथे पदकतक्त्यात ७० पदके जमा झाली तेव्हाच भारताला शतक पार करण्याचे वेध लागले होते आणि यंदा स्वप्नपूर्ती झाली. आता यापुढे हा उंचावलेला आलेख कायम राखण्यासाठी केवळ क्रीडापटूच नव्हे, तर संबंधित खेळाचे महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण या साऱ्यांना कटिबद्ध राहावे लागेल.

हांग् चौऊ येथील स्पर्धेत भारताचे एकूण ६५५ क्रीडापटू सहभागी झाले होते. २०१८ साली क्रीडापटूंची संख्या ५७० इतकी होती. यावेळी खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कडक निकष लावले व त्यांच्या अंमलबजावणीकडेही काटेकोरपणे लक्ष दिले. त्यामुळे काही जणांना फक्त ‘पिकनिकसाठी’ हांग् चौऊ येथे जाणे शक्य झाले नाही. काही खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांद्वारे पात्रता मिळविली, तरीही ते आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळू शकले नाहीत.

आशियाई, आंतरराष्ट्रीय मानांकनातील निकष पूर्ण होत नसल्यामुळे या खेळाडूंना परवानगी मिळाली नाही, त्यामुळे मेहनत घेणाऱ्या काही गुणवान क्रीडापटूंच्या पदरी निराशा आली. तरीही एकंदरीत क्रीडा मंत्रालयाच्या निर्णय योग्यच म्हणावा लागेल. केवळ सहभागासाठी स्पर्धेत भाग नको, तर पदकांसाठीच स्पर्धा हे धोरण क्रीडापटूंना आणखी मेहनत घेण्यास, क्षमता वाढविण्यास प्रेरित करणारे आहे.

हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी शतक पार केले, त्यामुळे यापुढे उंचावलेल्या अपेक्षांसह क्रीडापटूंना स्पर्धांत भाग घ्यावा लागेल. यामध्ये पॅरिसमध्ये वर्षभरानंतर होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचाही समावेश आहे.

ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकांचे ध्येय

१९०० साली पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या नावावर दोन रौप्यपदकांची नोंद झाली होती. ब्रिटिश-भारतीय अॅथलीट नॉर्मन प्रिचार्ड याने २०० मीटर धावणे व २०० मीटर अडथळा शर्यतीत प्रत्येकी एक रौप्यपदक प्राप्त केले.

त्यानंतर १९२८ साली अॅमस्टरडॅम येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. ‘जादूई’ हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या बहारदार कामगिरीमुळे १९२८ ते १९३६ या कालावधीत पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदकावरील हक्क कायम राखला; नंतरही भारतीय हॉकीपटूंनी ध्यानचंद यांचा वारसा कायम राखला.

१९८०मध्ये मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताने पुरुष हॉकीतील अखेरचे सुवर्णपदक मिळविले, मात्र नंतर दर्जा घसरला. कोविडमुळे २०२० सालची टोकियो ऑलिंपिक स्पर्धा २०२१ साली झाली, तेव्हा प्रदीर्घ काळानंतर भारताला पुरुष हॉकीत कांस्यपदक मिळाले.

कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी १९५२मधील हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील कांस्यपदक जिंकले. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक खाशाबा यांच्या गळ्यात शोभून दिसले. त्यानंतर वैयक्तिक पदकविजेत्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली.

१९९६ साली अटलांटा येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये लिअँडर पेसने पुरुष टेनिस एकेरीत कांस्यपदक पटकावले आणि भारताला पुन्हा पदकतक्त्यात स्थान मिळाले. त्यापूर्वी १९८४, १९८८ व १९९२मधील स्पर्धेत भारतीयांना ऑलिंपिक वारीवरून रिक्त हस्ते परतावे लागले होते.

मात्र १९९६पासून भारताने प्रत्येक ऑलिंपिकमध्ये किमान एक पदक जिंकले हेसुद्धा महत्त्वाचे आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वांत सफल कामगिरी नोंदविताना १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्यसह एकूण ७ पदके जिंकली. त्यापूर्वी, २०१२ साली लंडनमधील ऑलिंपिक स्पर्धेत भारताला एकूण ६ पदके मिळाली होती, परंतु तेव्हा सुवर्णपदकाचा रकाना भरलेला नव्हता.

भारतीय खेळाडू वैयक्तिक पातळीवरही सुवर्णपदक जिंकू शकतात हे दोन वेळा सिद्ध झालेले आहे. २००८ साली बीजिंग येथे नेमबाज अभिनव बिंद्रा याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये ‘सोनेरी’ वेध घेतला, तर दोन वर्षांपूर्वी टोकियोत नीरज चोप्रा याच्या भाल्याची फेक सुवर्णमय ठरली.

हा सारा इतिहास आठवण्याचे कारण म्हणजे, हल्लीच्या काळात भारतीय क्रीडापटूंचा स्तर कमालीचा उंचावलेला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतकी पदकांचे लक्ष्य बाळगले. ते साध्यही झाले. आता ऑलिंपिकमध्येही वाढत्या पदकांची अपेक्षा हवी.

प्रशासनाचीही भारतीय क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याची नजर आश्वासक बनली आहे. क्रीडापटू मेहनती आहेत, फक्त त्यांना योग्य स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध होण्याची आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे, आर्थिक टंचाई पदरी बाळगून क्रीडापटू पदकाचे स्वप्न पाहू शकत नाही.

केवळ सरकारकडूनच नव्हे, तर खासगी पातळीवर देशातील क्रीडा मैदानात आर्थिक गुंतवणूक होत आहे आणि त्यामुळे क्रीडापटूंचा हुरूप वाढलेला आहे, हे आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिंपिक स्पर्धेतील पदक कमाईवरून दिसून येते.

ऑलिंपिक-आशियाई स्पर्धेत तफावत

हांग् चौऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २८ सुवर्णांसह एकूण १०७ पदके जिंकली, म्हणून अशीच प्रेक्षणीय कामगिरी भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिंपिकमध्येही करतील अशी आशा बाळगणे तितकेसे योग्य ठरणार नाही. कारण या दोन्ही स्पर्धांत

मोठी दरी असून गुणवत्ता, प्रतिस्पर्धी खेळाडू यांच्यातील तफावतही आहे. ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक क्रीडापटू पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरतात, त्यामुळे आशियाई स्पर्धेतील कामगिरी खूप उंचावणे आवश्यक ठरते. हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत

भारताने नेमबाजीत सात सुवर्णांसह २२ पदके जिंकली, तर अॅथलेटिक्समध्ये सहा सुवर्णांसह सर्वाधिक २९ पदके पटकावली. ऑलिंपिकचा विचार करता आता नेमबाजी व अॅथलेटिक्स हे भारताचे सुवर्णपदकाचे खेळ गणले जातात. हांग् चौऊ येथे तिरंदाजीत भारताने पाच सुवर्णांसह एकूण नऊ पदके मिळविली, परंतु ऑलिंपिकमध्ये अजून एकाही भारतीयाला तिरंदाजीतील

पदक मिळालेले नाही. भारताच्या ऑलिंपिक इतिहासावर नजर टाकता, कुस्ती, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग हे नियमित पदकविजेते खेळ ठरले आहेत. हॉकीत भारताकडून अपेक्षा वाढली आहे. टेनिसमध्ये ऑलिंपिक पदक जिंकून खूप वर्षे उलटली आहेत.

हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला स्क्वॉश, क्रिकेट, कबड्डी, घोडेस्वारी, रोईंग, बुद्धिबळ, सेलिंग, ब्रिज, गोल्फ, रोलर स्केटिंग, कॅनोई, सेपॅकटॅक्रो, टेबल टेनिस या खेळांतही पदके मिळाली, मात्र यापैकी काही खेळ ऑलिंपिकमध्येच नाहीत आणि आहेत त्यात भारतीयांना आतापर्यंत पदके मिळालेली नाहीत. त्यामुळे वर्षभरात पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारत खूप पदके जिंकू शकेल अशी आशा करणे चुकीचे ठरेल.

एक मात्र खरे, आशियाई स्पर्धेत भारताने शतकी पदकांची आस बाळगली व ती साध्य झाली. आता ऑलिंपिकमध्ये पदकतक्त्यात दुहेरी आकडा गाठण्याचे उद्दिष्ट हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT