JN.1 Covid
JN.1 Covid esakal
साप्ताहिक

Covid 19 : JN.1 हा ‘व्हेअरिअंट ऑफ इंटरेस्ट’

सकाळ डिजिटल टीम

जगाने पहिल्यांदा कोरोना विषाणूच्या त्या व्हेअरिअंटबद्दल ऐकलं त्याला आता पाच वर्षं होतील.

शेवटच्या दिवशी, सगळं जग दुसऱ्या सहस्रकातल्या पहिल्या शतकातल्या दुसऱ्या दशकातल्या शेवटच्या वर्षाचं स्वागत करीत असताना चीनने जागतिक आरोग्य संघटनेला वुहान शहरात आढळलेल्या एका अनोळखी न्युमोनियाविषयी कळवले होते. जगाला वेढून उरणाऱ्या एका अनिश्चिततेची ती नांदी होती.

दुसऱ्या सहस्रकातल्या पहिल्या शतकातल्या दुसऱ्या दशकाचे पहिले वर्ष संपता संपता कोरोना नावाच्या माहिती असलेल्या विषाणूच्या कोविड-19, डेल्टा या अपरिचित अवतारांच्या मगरमिठीतून बाहेर पडून सुटकेचा निःश्वास टाकणाऱ्या जगाला सार्स-कोव्ह-2च्या B.1.1.529, ओमायक्रॉन किंवा ओमिक्रॉन नावाच्या आणखी एका अवतारानी भेडसावायला सुरुवात केली होती.

जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्याच दिवशी ‘व्हेअरिअंट ऑफ कन्सर्न’, चिंताजनक, असा शिक्का मारलेल्या या ओमायक्रॉनने जगभरातल्या शेअर बाजारांना धक्का दिला होता; काही देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावर आणि रोजच्या व्यवहारांवर पुन्हा निर्बंध आणायला सुरुवात केली होती.

या सगळ्या घटनाक्रमाची आठवण होण्याचं कारण म्हणजे JN.1 असे नामकरण झालेला कोविड-19चा नवा अवतार. दोन आठवड्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 हा ‘व्हेअरिअंट ऑफ इंटरेस्ट’ असल्याचे जाहीर केल्यापासून जगभरातल्या सर्वच आरोग्यसेवा सतर्क झाल्या आहेत.

JN.1 पसरत असला आणि वैद्यक क्षेत्राला अजूनही तो धोकादायक वाटत नसला तरी त्यावर लक्ष ठेवायला हवे, असे वैद्यक क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.

जग कोविड-19च्या विळख्यात सापडलेले असतानाच जगभरातले संशोधक आपल्याला यापुढच्या काळात सावध राहण्याविषयी सांगत होते.

कोविड-19 ही माणसाच्या आयुष्यातली शेवटची महासाथ नसणार, याची जाणीव करून देतानाच संशोधक येणाऱ्या काळात झुनोटिक म्हणजे प्राण्यांच्या संपर्कातून माणसांमध्येही पसरणारे आजार वाढत जातील यावर भर देत होते.

गेल्या दोन-अडीच दशकांत माणसासमोर आव्हानं उभी करणाऱ्या सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, एच१एन१, झिका अशी प्राणिजन्य आजारांच्या एका मालिकेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या इमर्जिंग इन्फेक्शस डिसीजच्या यादीमध्ये ‘डिसीज एक्स’चा म्हणजेच ‘ज्ञात असण्याच्या रेषेवर रेंगाळणाऱ्या अज्ञात आजारा’चा समावेश केला.

अज्ञाताविषयी सावधगिरी बाळगायची आणि आधीच्या अनुभवांतून शिकलेल्या धड्यांतून प्रतिकाराची काही किमान तयारी करण्याचा प्रयत्न करायचा, हा यामागचा उद्देश.

जगभर आता असे नव्याने उद्‍भवू शकणारे आजार, त्या आजारांना कारणीभूत ठरणारे विषाणू, त्यांच्यात होणारी उत्परिवर्तने अशा मुद्द्यांवर संशोधन सुरू आहे. या सगळ्याविषयी सकाळ साप्ताहिकने याआधीही लिहिल्याचे आपल्याला स्मरत असेलच.

सध्या चर्चेत असणारा JN.1 हा ओमायक्रॉनच्या एक्सएक्सबी कुळातल्या BA.2.86 चा वंशज आहे, असं उपलब्ध माहिती सांगते. ओमायक्रॉनचा मूळपुरुष असणाऱ्या सार्स-कोव्ह-2मधील उत्क्रांत होत जाणारे ‘एस’ प्रोटीन हा संशोधकांच्या मते कळीचा मुद्दा आहे.

मानवी पेशींना संक्रमित करणाऱ्या प्रथिनाचा हा नवा अवतार कोरोनाच्या याआधीच्या आवृत्त्यांमुळे निर्माण झालेल्या प्रतिपिंडांना (अॅन्टिबॉडीज) जुमानत नाही, असे जपानी संशोधकांच्या लक्षात आले आहे.

हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे कारण न दिसणाऱ्या विषाणूंच्या बदलत राहणाऱ्या अवतारांबरोबर राहताना आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे आपणच आपल्याला वारंवार सांगत राहावं लागणार आहे.

विषाणूच्या प्रत्येक अवताराला शह देण्याची क्षमता आपल्या संशोधकांकडे आहेच. कोविडच्या महासाथीत ही संशोधन क्षमता आपण अनुभवलीही आहे.

आताही नवी औषधं, नव्या लशी विकसित होतीलच, पण त्याचा अर्थ आपण आपले हट्टाग्रह न सोडता आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं असा नाही.

सतत रूप बदलत राहाणाऱ्या विषाणूने आपल्याला पुन्हा आरोग्याशी संबंधित असणाऱ्या अनेक नकोशा बाबींच्या गर्तेत ढकलू नये म्हणून (आणि खरंतर एकुणातच) आपल्याला आपल्या शब्दकोशातल्या बेसावध, बेफिकीर, गाफील, निष्काळजी, बेपर्वा, बेदरकार, सुस्त अशा शब्दांपासून कटाक्षाने लांब राहाण्याचा आणखी एक संकल्प या येत्या नव्या वर्षाच्या निमित्ताने पुन्हा करावा लागेल.

म्हणून काळजी घ्या!

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT