टीव्हीवरील जाहिरातींची
कालमर्यादा हटवली
प्रतितास १२ मिनिटे होता कालावधी
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २२ : दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील जाहिरातींच्या कालावधीवर असलेली प्रतितास १२ मिनिटांची मर्यादा केंद्र सरकारने हटविली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, २०२६’ अधिसूचित केले असून, त्याद्वारे जाहिरातींच्या कालावधीवरील ही मर्यादा रद्द करण्यात आली आहे.
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम, १९९४ मधील नियम ७ च्या उपनियम (११) वगळण्यात आला आहे. या उपनियमाद्वारे दूरचित्रवाणीवरील जाहिरातींचा कालावधी प्रतितास १२ मिनिटांपर्यंत मर्यादित करण्यात आला होता. २००६ मध्ये जाहिरातींच्या कालावधीवर मर्यादा घालण्यात आली, त्या वेळी देशात केवळ ६२ टीव्ही वाहिन्या होत्या. आता ही संख्या ९०० हून अधिक झाली आहे. त्यावेळी केबल टीव्हीचे प्रसारण प्रामुख्याने ॲनालॉग पद्धतीने होत असल्याने वाहिन्यांची संख्या आणि ग्राहकांना उपलब्ध पर्याय मर्यादित होते.
केबल टीव्हीच्या संपूर्ण डिजिटायझेशननंतर डीटीएच, केबल टीव्ही, हेडएंड-इन-द-स्काय (एचआयटीएस) आणि आयपीटीव्ही यांसारखी प्रसारण माध्यमे डिजिटल झाली आहेत. सध्या या माध्यमांवर ३०० ते ५०० किंवा त्याहून अधिक वाहिन्या उपलब्ध असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर पर्याय मिळत आहेत. त्यामुळे टीव्ही क्षेत्रात स्पर्धाही वाढली आहे.
सशुल्क किंवा मोफत अशा दोन्ही प्रकारच्या टीव्ही वाहिन्या उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातींवर अवलंबून आहेत. मात्र, पारंपरिक टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातींच्या कालावधीची मर्यादा असताना डिजिटल माध्यमांवर अशी मर्यादा नाही. त्यामुळे दोन्ही माध्यमांमध्ये समान व्यावसायिक संधी उपलब्ध नव्हत्या.
निष्पक्ष स्पर्धेला चालना
टीव्ही उद्योगातील; तसेच टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील स्पर्धा लक्षात घेऊन जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. व्यवसाय सुलभता आणि निष्पक्ष स्पर्धेला चालना देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.