पोलिसांच्या मध्यस्थीने ४२ वर्षांचे वैर संपुष्टात
बार्शी तालुक्यात कव्हे येथील कट्टर विरोधकांची गळाभेट
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. २७ : कव्हे (ता. बार्शी) येथील दोन परिवारांमध्ये तब्बल ४२ वर्षांपासून सुरू असलेला वाद बार्शी तालुका पोलिसांच्या पुढाकाराने संपुष्टात आला. तीन पिढ्यांपासून सुरू असलेला संघर्ष, न्यायालयीन चकरा आणि गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही परिवारांनी जुने वैर विसरून एकमेकांची गळाभेट घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचे गावात कौतुक होत आहे.
सागर हजारे आणि सत्यवान हजारे यांच्या परिवारांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता. या संघर्षातून दोन्ही बाजूंविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून, त्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन्ही कुटुंबे त्रस्त झाली होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दोन्ही परिवारांशी संवाद साधत वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कायदेशीर बाबी, भविष्यातील परिणाम आणि दीर्घकाळ चाललेल्या वादामुळे झालेल्या नुकसानीची जाणीव करून दिली.
मध्यस्थीच्या प्रयत्नांना पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गवळी, अमित घाडगे, गावचे उपसरपंच वैभव शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब पाटील, डॉ. प्रकाश बुरगुटे यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी सहकार्य केले. यापुढे शांततेने, सलोख्याने आणि बंधुभावाने राहण्यास दोन्ही परिवारांनी सहमती दर्शविली. पोलिसांच्या या पुढाकारातून गुन्ह्यांवर कारवाईसोबतच संवाद व मध्यस्थीद्वारे सामाजिक सलोखा निर्माण करण्याची भूमिका अधोरेखित झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.