PNE26W46101 : आपली एसटी ॲप
‘आपली एसटी’मधून समजणार गाड्यांची वेळ अन् लोकेशन
प्रवाशांसाठी महामंडळाने बनविले ॲप; परिवहनमंत्र्यांनी बुधवारी बोलावली बैठक
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३१ : स्वारगेटसारखी घटना यापुढे राज्यात कोठेही घडू नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने त्यांच्याकडील सुमारे १२ हजार बसगाड्यांसाठी ‘आपली एसटी’ ॲप तयार केले आहे. दररोज एसटी बसमधून सरासरी ५० लाख लोक प्रवास करतात. या प्रवाशांना आता ‘आपली एसटी’ ॲपमधून सर्व बसगाड्यांचे लोकेशन, गाड्यांच्या वेळा आणि बसमधील प्रवाशांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर आधीच यायची आवश्यकता नसेल. प्रवाशांच्या, विशेषतः लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महामंडळाने हे ॲप विकसित केले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुरेशा प्रमाणात बसगाड्या उपलब्ध आहेत. तास-अर्ध्या तासाला गाड्या आहेत, तरीपण बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. अनेकांना वेळेवर नाही गेले तर बसगाडी चुकेल, अशी भीती असते. त्यामुळे प्रवासी आधीच स्थानकावर येऊन बसतात. त्यावेळी प्रवाशांच्या बाबतीत काहीतरी अनुचित प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर महामंडळाने ‘आपली एसटी’ हे ॲप तयार केले आहे. याचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून आता हे ॲप प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे. बुधवारी (ता. २) सकाळी साडेदहा वाजता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ॲपमध्ये इंग्रजी भाषेत सुविधांची माहिती दिली असून आता त्यात मराठी, हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासंदर्भात बैठकीत निर्णय होऊन दिवाळीपूर्वी हे ॲप सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर घरबसल्या लाडक्या बहिणींसह सर्व प्रवाशांना आपण प्रवास करणारी बस नेमकी कोठे आहे, किती वाजता स्थानकावर येणार आहे, अशा सर्व बाबी समजणार आहेत.
कोट:
प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘आपली एसटी’ ॲप तयार केले आहे. लवकरच हे ॲप प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. बुधवारी (ता. २) अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. प्रवाशांना सहजपणे ॲपद्वारे संपूर्ण माहिती मिळेल. त्यातून प्रवाशांचा वेळ व पैसा खर्च होणार नाही, यादृष्टीने हे ॲप असणार आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये अशी...
- ॲपमध्ये एकूण आठ टप्प्यांत प्रवाशांना माहिती देण्यात आली आहे.
- धावणाऱ्या बस, बसचे लोकेशन, वेळापत्रक, बसमधील प्रवासी, जवळचे बसस्टॅण्ड, बसबद्दल माहिती दिली जाणार आहे.
- राज्यातील जिल्हानिहाय बसस्थानक, तेथील अधिकारी व लॅण्डलाइन नंबरची माहिती व अत्यावश्यक सेवेतील क्रमांक दिले आहेत.
- यात बस सध्या कोठे आहे, कोणत्या मार्गाने येत आहे, किती वाजता बस येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, याचीही माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.