पुणे, ता. २ ः अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पुण्यात ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. मराठी भाषेचा अभ्यास, संशोधन, डिजिटल जतन-संवर्धन आणि प्रसाराच्या उद्देशाने डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेत (अभिमत विद्यापीठ) हे केंद्र स्थापन केले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा आदेश प्रसिद्ध केला. यात मराठीसह पाच अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांसाठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यात मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या पाच भाषांची पाच स्वतंत्र केंद्रे देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून संबंधित भाषांचे शैक्षणिक संशोधन, डिजिटायझेशन, जतन आणि ऐतिहासिक वारशाचा प्रसार करण्यात येणार आहे.
मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. त्यामुळे हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येलाच ही आनंदवार्ता मराठीजनांना मिळाली आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी राज्य सरकारने यापूर्वीच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. तसेच, हे केंद्र पुण्यातच सुरू करणार असल्याचे सांगितले होते.
या केंद्राच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमांवर आनंद व्यक्त केला आहे. ‘‘हे केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने आधीच हाती घेतले होते. तो केंद्राकडे सादर करुन आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार’’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.