पुणे, ता. ५ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्यातर्फे सीओईपीच्या चिखली येथील रिसर्च अँड इनोव्हेशन पार्कमध्ये ॲडव्हान्स्ड एरगोनॉमिक्स अँड ह्यूमन फॅक्टर्स रिसर्च सेंटर (एईएचएफआरसी) स्थापन करण्यासंदर्भात एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. हे देशातील पहिलेच संशोधन केंद्र असून, यात १०५ कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक करण्यात येणार आहे.
या संदर्भातील संमती पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. अविनाश जोशी, डॉ. एस. पी. महाजन, डॉ. रेजी मथाई, मेधा जांभळे आदी उपस्थित होते. सुमारे ३८ हजार चौरस फुटांत उभारण्यात येणाऱ्या या केंद्राद्वारे स्वदेशी संशोधन आणि विकास क्षमता बळकट करणे आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेशी सुसंगत नवोन्मेषाला चालना देणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. केंद्रात संशोधन, चाचणी, प्रमाणीकरण, प्रशिक्षण, नवोन्मेष आणि उद्योग सहभागावर भर देण्यात येईल.
डॉ. भिरूड म्हणाले,‘‘संशोधनाचे सामाजिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. हे केंद्र या क्षेत्रातील आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग सहभागासाठी एक अद्वितीय व्यासपीठ ठरणार आहे. भारतीय मानकांच्या विकासाला, स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीला आणि राष्ट्रीय-जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम अशा कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीला या उपक्रमातून महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.’’
‘एआरएआय’चे डॉ. मथाई म्हणाले,‘‘तंत्रज्ञान अधिकाधिक मानवी-केंद्रित होत असताना सुरक्षितता, वापर योग्यता आणि वापरकर्त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासंदर्भात एर्गोनॉमिक्स आणि ह्यूमन फॅक्टर्स तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मानवी-केंद्रित डिझाइन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताची क्षमता बळकटीकरणासाठी ‘एईएचएफआरसी’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.