SLC26B30483
फोटोओळ :
सोलापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
प्रगत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा
जसप्रित सिद्धू यांचे आवाहन; अभियांत्रिकीच्या १७० प्राध्यापकांचा सहभाग
सोलापूर, ता. २ ः भारताला २०४७ पर्यंत प्रगत राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अभियांत्रिकी प्राध्यापकांनी ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगसारखे प्रगत तंत्रज्ञान अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावे, असे आवाहन नॅशनल सेंटर फॉर ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, हैदराबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसप्रित सिद्धू यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ आणि यंत्र अभियांत्रिकी अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरू कर्नल प्रा. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. प्राध्यापकांच्या कौशल्यविकासासाठी राष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधून विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रगत तंत्रज्ञानातील संशोधनासाठी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे उपस्थित होते.
प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी प्रास्ताविक केले. या प्रशिक्षणात सोलापूर परिसरातील २२ अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनमधील यंत्र अभियांत्रिकीच्या १७० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. विविध आयआयटींसह नामांकित संस्थांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. भाग्येश देशमुख यांनी आभार मानले.