दुर्मीळ औषधींचे आगार
आगडगाव हे गर्भगिरी डोंगररांगेत आहे. हा परिसर दुर्मीळ वनौषधींचे आगार आहे. नवनाथांना वनस्पतींचे ज्ञान होते. या डोंगररांगेत अशा बहुगुणी वनस्पती सापडल्यामुळे नवनाथांचे वास्तव्य गर्भगिरीच्या डोंगररांगेत दीर्घकाळ होते. विविध वन्य पशुपक्ष्यांचाही यामुळेच या डोंगरात वावर असतो. गोरक्षनाथांनी पूर्ण गर्भगिरी सोन्याचा केला, असा उल्लेख पोथी- पुराणांत आहे. सध्याही या औषधी वनस्पतींचा विचार केला, तर या डोंगराचे मोल सोन्यापेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल.
- डॉ. माधव बोरुडे, एम. डी. (आयुर्वेद)
- डॉ. स्वाती बोरुडे, एम. डी. (आयुर्वेद)
...
मानव किंवा पशू यांच्या आजाराला बरे करण्यासाठी वनौषधींचा मोठा उपयोग होतो. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याही ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा उपचार पद्धतीत आयुर्वेदिक उपचार पद्धती आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. साईडइफेक्टपासून वाचविण्यासाठी आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागतो.
औषधी वनस्पतींचा खजिना आपल्याभोवती दडलेला असतो, तो शोधावा लागतो. त्याचा अभ्यास करावा लागतो. विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधे देणारी अनेक मंडळी गावोगावी सापडतात. त्यांच्या औषधांनी आजारांवर गुणही येतो. साधी ठेच लागून जखम झाली, तर कोठेही सहज उपलब्ध होणारी ‘टनटनी’ ही वनस्पती चोळून लावल्यास जखम बरी होते. गजकर्ण किंवा इसबगोल यासारख्या जखमा हमखास बरे करणारी औषधी देणारी मंडळीही आहेत.
आगडगावच्या परिसरातील वाळूक टेंभा, खांडी, वाघजाई, देवदरा आदी डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. गोरख चिंचेचे वृक्ष आहे. ही चिंच अत्यंत दुर्मीळ व अनेक आजारांवर उपाय करणारी आहे. मुसळी, शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, सोनतरवड, अर्जुनवेल, गुळवेल, अमृतवेल, बेल, भुईसल, चंदन, खैर, बाभूळ, अमोनी, निरधामना, हेकुळी, धावडा, वड, लिंब, घेटुळी, चिंच, सापकांदा, रानकांदा, चिबूकाटा, सराटा, रिंगणी, काटेरी रिंगणी, साबर, तरवड, रुई, तांदुळचा, धोत्रा, निंब, तुळस, रानतुळस, पानकणीस, आपटा, एरंडी, तेलतुकडी, महादूत, निवडुंग, मेडसिंग, पाचुंदा, केकताड, दुधी, गुग्गुळ, निलगिरी, गुलमोहोर, घाणेरी, बांबू, रानमटकी, उंबर, बिबवा, महाडूक, सौंदड, अर्जुनसाल, उंबर, पिंपळ, सागर, पाथरी, पांगारा, सिंद, चिल्हर, सिसम, लोखंडी, पांढरी, रिठा, रामफळ, पळस, बहावा, निमोणी, हिवर, खिरणी, कोरफड, चिकणी, घायपती, साजरगोंडा, दवणा आदी औषधी वनस्पती सर्रास आढळतात. डोंगरात चंदनाची झाडे सापडत असल्याने अनेक चंदनतस्करांची उपजीविका गर्भगिरीवर चालते. जांभूळ, आंबा, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई, सीताफळ आदी फळांनी बागा बहरतात.
टेंभुर्णी, बोरे, खरमटे, कांगोण्या, जांभूळ, करवंद, निवडुंग, पिठावण्या, हामनं, खिरण्या, शेवंत्या, रानमटकी, धामण्या, तांबोरी आदी रानमेवा, तर येथील ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारा असतो. जाई-जुई, झेंडू, मोगरा जास्वंदी, शेवंती आदी सुगंधी फुलांनी डोंगर बहरतात. आनंददरी (बाळनाथ गड), वाघजाई हे डोंगर म्हणजे करवंदांची खाणच म्हणावी लागेल. शहा डोंगरावर खिरण्यांची अनेक झाडे आहेत.
गवताच्या विविध जाती येथे आहेत. त्यात कन्हेर, पवना, कुंदा, कुसळी, हरळ, शिपरुट, पाथरी, दुधावणी, कोंबडा, कुसमुड, तांदुळचा, कुंजीरचा, दिवाळी, लालडोंगा, मोळ, पानकणीस, राजहंस आदींचा समावेश आहे. प्रत्येक मोसमात या गर्भगिरीच्या झोळीत निसर्ग ही फळे - फुले भरभरून दान करतो. त्यामुळेच मधमाश्या, कीटक येथे मकरंद गोळा करण्यासाठी कायम घोंगावताना दिसतात.
या भागात खरिपात बाजरी, वाटाणा, मूग, सूर्यफूल, तर रब्बीत ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. करडई, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणे आदींचे तेल पाडून शेतकरी घरगुती वापर करतात. उन्हाळी (विंचू उतरतो), पांढरी गुंज (अर्धशिशीला गुणकारी), काळे तीळ (मूळव्याधीसाठी उपयुक्त), कळलावी, धामसी, कडू दोडका, पडवळ, पादरवासी, निरगुडी, बहावा, मेडसिंग, सौंदड, वांज, करटुली, गुंज या वनस्पतींबरोबर बकान, पांढरी घोसळी, जायफळ, तांबडी जाई, टाखळ, पळस, हिरडा, मुळा, मूग मोरचूद, तोंडली, ब्रह्मदंडी, उटकटार, केवडा आदी वनस्पती त्या-त्या हंगामांमध्ये आढळतात.
उपयुक्त ठरणारी नाई ही दुर्मीळ वनस्पती या डोंगरात मोठ्या प्रमाणात सापडते. पांढरी अपमारी व नाई या दोन वनस्पतींपासून मधुमेहावर उपचार केले जातात, तसेच मधुनाशिनी ही वनस्पतीही मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरतात. नारळाची कवटी व टनटनी, तसेच इतर वनस्पतींपासून इसब या आजारावर औषध तयार होते.
चित्रक (मूळव्याध व इतर आजारांवर), धायटी, अडुळसा (कफ पातळ करण्यासाठी), बावच्याचे पीट (कोडासाठी उपयुक्त), रान भुईतरवड (पोटाच्या विकारांसाठी), सोनामुखी, हरणखुरी (उष्णतारोधक असते. हरणांच्या आवडीची वनस्पती), करटुली (फिट्ससाठी), पांढरी जादी (स्त्रीरोग), ज्येष्ठमध (मूळव्याधीसाठी), देवडांगरी (मोड मूळव्याधीसाठी), तालीम खाना (धातुपौष्टिक) आदी विविध आजारांवर उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पती या डोंगरात आहेत. तोंड आल्यास जाईचा पाला चावला, तर ते गुणकारी ठरते. जाई ही वनस्पती जाईच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात आहे. अर्जुन सादाड या वनस्पतीची साल हाडाला लागलेला मार व शरीरावरील जखमांवर गुणकारी असते.
डोंगरातील या वनस्पतींचा उपयोग करून काही ठिकाणी उद्यान सुरू केले आहेत. प्रत्येक घराच्या आवारात किमान महत्त्वाच्या दहा वनस्पती असाव्यात, यामुळे किरकोळ आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
‘बाई मी लाजाळू गं लाजाळू’ या गाण्याच्या ओळी फक्त व्यक्तीपुरत्याच मर्यादित नाही, तर त्याला अपवाद आहे. गावाच्या उत्तरेला असलेल्या खांडी डोंगर परिसरात लाजाळूची असंख्य झुडपे आढळतात. त्याला हात लावला, की ही वनस्पती आपली पाने मिटवून घेते व लाजते.
आपण डोंगरातून फिरताना अनेक मौल्यवान वनस्पती पायाखाली तुडवून जातो, पण त्यांची ओळख झाल्यास त्याचे महत्त्व अधिक कळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.