कृषी महाविद्यालयातील
गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल
तत्कालीन सहयोगी अधिष्ठात्यांसह सात जणांचा समावेश
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत येथील कृषी महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अखेर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विविध कामांच्या देयकांमध्ये अनियमितता, ११५ बनावट देयकांची निर्मिती, एकाच कामासाठी दुबार देयके काढणे, तसेच १३८ महत्त्वाच्या फाईल्स व मूळ कागदपत्रे गहाळ झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार कृषी महाविद्यालयाचे विद्यमान सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर यांनी गेल्या महिन्यात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यात करण्यात आली होती. महाविद्यालयाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांच्या नोंदी, देयके आणि संबंधित कागदपत्रांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याचे चौकशीत समोर आले. संबंधितांनी संगनमत करून ११५ बनावट देयके तयार केली असून, त्याद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने विविध समित्या नियुक्त केल्या होत्या. समित्यांच्या तपासादरम्यान संबंधित कामांच्या १३८ फाईल्स आणि मूळ कागदपत्रे कार्यालयातून गहाळ असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधितांकडे विचारणा करण्यात आली असता समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, १७ जून २०२६ रोजी कुलगुरूंच्या मान्यतेनंतर कुलसचिव कार्यालयाने डॉ. भोयर यांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतर फौजदारी विषयातील अधिवक्ता अॅड. आशिष देशमुख यांच्या सल्ल्याने प्रकरणाचा अभ्यास करून २९ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे विद्यापीठाचे विद्यमान संशोधन संचालक तथा कृषी महाविद्यालयाचे तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, सहाय्यक कुलसचिव हंसराज राठोड, वरिष्ठ लिपिक तथा भांडारपाल सौरभ मोरे, कृषी सहायक तथा भांडारपाल विलास गुल्हाने, भांडारपाल पंकज पाल (मृत), मदन लांजेवार (मृत) तसेच खासगी कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापरासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.