पुणे

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक ‘बाएफ’च्या कार्यशाळेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

CD

शिवणे, ता. १८ : शेतीतील कष्ट कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. कृषी स्टार्टअप्स आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या पुण्यातील मुख्यालयात आयोजित ‘ग्रीनओव्हेशन ॲग्री मेकॅनायझेशन चॅलेंज’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस दूरदृश्य संदेशाद्वारे बोलत होते. ‘बाएफ केअर्स’, अमेरिकेतील अर्थऑन फाउंडेशन आणि स्विचऑन फाउंडेशन यांच्यावतीने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक गरजा, शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित केल्यास कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी स्टार्टअप्सनी एफपीओंशी जोडले जाणे आवश्यक आहे, असे नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर यांनी सांगितले.
पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक अध्यक्ष आणि बायफचे विश्वस्त डॉ. आनंद देशपांडे यांनी स्टार्टअप्सना व्यावसायिक नियोजनाचे महत्त्व सांगितले. कोणती समस्या सोडवायची, संभाव्य ग्राहक कोण आणि व्यवसायाचा आर्थिक प्रवाह कसा टिकवायचा, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या गरजा, उत्पादनाची स्वीकारार्हता, अर्थसंकल्प, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील स्थान लक्षात घेऊन व्यवसायाचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
‘बाएफ’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. भारत काकडे यांनी कमी होत असलेले जमीनधारणेचे क्षेत्र, मर्यादित शेती उत्पन्न आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या अपुऱ्या संधी ही प्रमुख आव्हाने असल्याचे सांगितले. हवामानपूरक शेती, अक्षय ऊर्जा, सौरशेती आणि पर्यावरणपूरक उद्योगांत नव्या संधी असून, २०३० पर्यंत एक कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे ‘बाएफ’चे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘बाएफ’चे उपाध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी ग्रामीण विकासातील समस्या उद्योजकांसाठी संधी ठरू शकतात, असे सांगितले. मात्र, नवकल्पना विकसित करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन, त्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हा ‘ग्रीनओव्हेशन’चा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्विचऑन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक एकता जाजू यांनी शेतकऱ्यांना यंत्रसामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात एफपीओंची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या महाव्यवस्थापक समृती भगत यांनी कृषी उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य व संस्थात्मक पाठबळाची गरज व्यक्त केली.
पशुधन विकासातही तंत्रज्ञानाच्या वापराला मोठी संधी आहे. जीनोमिक्स, पशुखाद्य व्यवस्थापन, मिथेन उत्सर्जन नियंत्रण आणि पशुरोगांची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांमुळे उत्पादकता वाढविता येईल, असे आवाहन बायफचे वैज्ञानिक संशोधन व पशुधन विकास विभागाचे उपाध्यक्ष डॉ. जयंत खडसे यांनी केले.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : ओबीसी हॉस्टेल बांधण्यासाठी महसूल विभागाचा जागा देण्याचा निर्णय

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT