पुणे

दिवाळी अंकासाठी लेख

CD

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ग्रंथप्रेम

एका हाती तलवार, दुसऱ्या हाती ग्रंथ!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे उत्तम प्रशासक, न्यायप्रिय राज्यकर्त्या, कुशल मुत्सद्दी आणि बारव, मंदिर-घाटांची निर्मिती व जीर्णोद्धार करणाऱ्या धर्मपरायण राजमाता, अशी त्यांची ओळख सर्वपरिचित आहे. मात्र या सर्व कर्तृत्वाच्या मुळाशी असलेले त्यांचे विद्याप्रेम, वाचनाची आवड आणि ग्रंथप्रेम हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा पण तुलनेने कमी चर्चिला गेलेला पैलू. राज्यकारभार, युद्धमोहिमा, न्यायनिवाडे आणि लोककल्याणकारी कामांच्या प्रचंड व्यापातही ज्ञानार्जनाची ओढ जपणारी ही असामान्य राज्यकर्ती होत्या. त्यांच्या जीवनाकडे पाहताना ‘एका हाती तलवार आणि दुसऱ्या हाती पुस्तक’ हे वर्णन सार्थ ठरते.
- किरण चव्हाण, माढा

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांनी त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार करता मुलीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांना वाचता-लिहिता यावे, यासाठी वडिलांनीच शिक्षण दिल्याचा उल्लेख देवी अहिल्या विद्यापीठाच्या चरित्रविषयक माहितीत आढळतो. या प्राथमिक शिक्षणातून त्यांच्या ज्ञानप्रवासाची सुरुवात झाली.
पुढे होळकर घराण्यात आल्यानंतर मल्हारराव होळकर यांच्यासारख्या अनुभवी सेनानी आणि प्रशासकाचा सहवास त्यांना लाभला. राजकारण, प्रशासन, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि धर्म-संस्कृती यांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी आत्मसात केले. केवळ परंपरेने मिळालेल्या ज्ञानावर समाधान न मानता विविध विषय समजून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अभ्यासू वृत्ती ही त्यांच्या निर्णयक्षमतेतूनही दिसून येते.
अहिल्यादेवींनी महेश्वरला राजधानी केल्यानंतर या नगरीला केवळ राजकीय आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित केले नाही, तर कला, साहित्य, संस्कृती आणि विद्वत्तेचे केंद्र बनविण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या ग्रंथप्रेमाची साक्ष त्यांच्या संग्रही असलेल्या हस्तलिखित ग्रंथांच्या नोंदी देतात.
त्या काळात आजच्यासारखी छपाईची साधने सहज उपलब्ध नव्हती. ग्रंथांची निर्मिती आणि जतन करण्यासाठी हस्तलिखितांवर अवलंबून राहावे लागे. अशा परिस्थितीत विविध ठिकाणांहून ग्रंथ मिळविणे, त्यांच्या प्रती तयार करून घेणे आणि त्यांचे जतन करणे हे मोठे काम होते. अहिल्यादेवींच्या संग्रहात शेकडो हस्तलिखित धर्मग्रंथ असल्याचे उल्लेख आढळतात. काही ग्रंथ महाराष्ट्रातील चांदवड येथून मागविल्याच्या नोंदीही सांगितल्या जातात. त्यांच्या संग्रहातील ग्रंथांचे वाचन, पारायण आणि श्रवण नियमितपणे होत असे. यावरून ज्ञान आत्मसात करण्याची तळमळ दिसते. त्यांच्या ग्रंथसंग्रहात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य, श्रीधरी (अध्याय १८), गीतगोविंद (सटीक पत्रे), चित्रषष्ठीमीमांसा, कान्यकुब्ज माहात्म्य अशा महत्त्वाच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. या ग्रंथांची नावे पाहिली तरी त्यांच्या अभ्यासाचा आवाका लक्षात येतो. धर्मशास्त्र, महाभारत, रामायण, पुराणे, संतसाहित्य, काव्य आणि ज्योतिष अशा विविध ज्ञानशाखांशी त्यांचा परिचय होता. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीसारख्या संतसाहित्याचा आणि निर्णयसिंधूसारख्या धर्मशास्त्रीय ग्रंथाचा त्यांच्या संग्रहात समावेश होता. यावरून त्यांच्या वाचनाची व्याप्ती केवळ कर्मकांडापुरती मर्यादित नव्हती, असे म्हणता येते.
महेश्वरच्या दरबारात देशाच्या विविध भागांतून विद्वान, पंडित, शास्त्री आणि साहित्यिक येत असत. अहिल्यादेवी त्यांना योग्य तो मानसन्मान देत असत. विद्वानांचा सहवास, त्यांच्याशी चर्चा आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांना त्यांच्या दरबारात महत्त्वाचे स्थान होते. ग्रंथालयाशी संबंधित नोंदींमध्ये मल्हारभट्ट मुळ्ये, जानोबा पुराणिक, रामचंद्र रानडे, काशीनाथ शास्त्री, मनोहर बर्वे, बलिरामजी, गणेशभट्ट, त्र्यंबकभट्ट, महंत सुजानगिरी गोसावी, गोविंदराम पांडे आणि दाजी रघुनाथ यांसारख्या विद्वानांची नावे आढळतात. या विद्वानांचा सन्मान करणे म्हणजे केवळ दरबारी परंपरा पाळणे नव्हे, तर ज्ञान आणि विद्वत्तेला राजाश्रय देणे होय. सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही ज्ञानाच्या क्षेत्रातील जाणकारांचे महत्त्व ओळखणारी त्यांची दृष्टी यातून स्पष्ट होते. मराठी साहित्यविश्वातील कवी मोरोपंत आणि शाहीर अनंत फंदी यांचाही अहिल्यादेवींनी आदर-सत्कार केला होता. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात या घटनेला विशेष महत्त्व आहे. शाहीर अनंत फंदी हे लावणी, पोवाडे आणि फटके या काव्यप्रकारांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या काव्यात मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधन आणि उपदेशाचाही आविष्कार दिसतो. मराठी विश्वकोशातील अनंत फंदी यांच्या चरित्रलेखात अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून उतारवयात ते कीर्तन करू लागल्याची नोंद आहे. या घटनेतून अहिल्यादेवींची साहित्य आणि कलांकडे पाहण्याची दृष्टी समजते. कलाकाराचा सन्मान करतानाच त्याच्या कलेला विधायक दिशा मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. ही बाब त्यांच्या सांस्कृतिक जाणिवेचे दर्शन घडवते.

त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांचा उपयोग केवळ राज्यविस्तारासाठी न करता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. त्याचबरोबर ज्ञान आणि विद्वत्तेला राजसत्तेइतकेच महत्त्व दिले.

आजच्या काळात वाचनसंस्कृती, ग्रंथालये आणि वैचारिक संवाद यांविषयी चर्चा होत असताना अहिल्यादेवींचे ग्रंथप्रेम विशेष प्रेरणादायी ठरते. राज्यकारभाराच्या प्रचंड व्यापातही ज्ञानाची ओढ जपता येते, हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले.
म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण करताना त्यांच्या हातातील शिवलिंग आणि तलवारीसोबतच त्यांच्या ग्रंथसंग्रहाचीही आठवण ठेवली पाहिजे. कारण त्या केवळ मंदिरांचे आणि घाटांचे निर्माण करणाऱ्या राजमाता नव्हत्या, तर ज्ञान, संस्कृती आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या विदुषी राज्यकर्त्या होत्या.
एका हाती तलवार आणि दुसऱ्या हाती ग्रंथ घेऊन राज्य करणाऱ्या या राजमातेचे व्यक्तिमत्त्व आजही समाजाला ज्ञान, विवेक, कर्तव्य आणि लोकसेवेची प्रेरणा देते.

चौकट
न्यायशास्त्रावरील ग्रंथ ‘अहिल्याकामधेनु’
अहिल्यादेवींच्या प्रेरणेने आणि आश्रयाने त्या काळातील महान पंडित खुशालीराम राय शास्त्री यांनी ''अहिल्याकामधेनु'' नावाचा धार्मिक, विधी आणि न्यायशास्त्रावरील एक मोठा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा अहिल्यादेवींच्या काळातील साहित्य निर्मितीचा सर्वात मोठा थेट ऐतिहासिक पुरावा मानला जातो. हा ग्रंथ लिहिताना लेखकाने याज्ञवल्क्य, पराशर, नारद, बृहस्पती यांच्या स्मृती तसेच विज्ञानेश्वराची ''मिताक्षरा'', हेमाद्रीचा ''चतुर्वर्गचिंतामणी'' आणि नीलकंठ भट्टांचे ''भगवंतभास्कर'' यांसारख्या शेकडो प्राचीन, पूर्व मध्ययुगीन
ग्रंथांतील संदर्भ एकत्र केले आहेत. याचाच अर्थ हे ग्रंथ खुद्द अहिल्यादेवींच्याही वाचनात आले असणार.
त्यांनी राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली. तेथे त्यांनी एक मोठे ग्रंथालय (पोथीखाना) उभारले होते, जिथे जुन्या हस्तलिखितांचे जतन केले जाई. या शासकीय ऐतिहासिक पत्रांमध्ये महेश्वर दरबारात चालणाऱ्या साहित्यिक घडामोडी, दरबारातील विद्वानांची नावे आणि त्यांना ग्रंथनिर्मिती साठी दिलेल्या रकमेच्या नोंदी (रोजकीर्द) आहेत. यात अहिल्यादेवींच्या काळातील महेश्वर येथील विणकर, मूर्तिकार यांच्यासोबतच कवी आणि लेखकांना दिलेल्या सनदा आणि जहागिरींची अचूक ऐतिहासिक नोंद आहे.


चौकट
धर्माची चिकित्सा अन् सुधारणा
होळकर दप्तरातील मूळ मोडी पत्रांचा अभ्यास करून लिहिलेल्या ग्रंथांमध्ये अहिल्याबाईंनी केवळ मराठीच नव्हे, तर संस्कृत आणि हिंदी (ब्रजभाषा) साहित्यालाही प्रोत्साहन दिल्याचा पुरावा मिळतो. यासोबतच काशी, जगन्नाथपुरी, आणि पंढरपूर येथील अनेक संस्कृत पंडितांना दरवर्षी विद्वानांची सभा भरवून दक्षिणा आणि वर्षासने सुरू केली. यामुळे अनेक संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांच्या प्रती तयार करणे आणि त्यांचे संवर्धन करणे शक्य झाले.
एकीकडे प्रशासकीय जबाबदाऱ्या यथार्थ सांभाळणाऱ्या अहिल्याबाई ज्ञानाच्या अशा अथांग सागरात विहार करत होत्या, ज्ञानोपासना करत होत्या, धर्माची सखोल चिकित्सा व विवेचन करत होत्या म्हणूनच धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा क्रांतीकारी निर्णय १८ व्या शतकात अर्थात मध्ययुगात त्या घेऊ शकवू शकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT