अहिल्यानगर-बीड रेल्वे
प्रवास होणार सुपरफास्ट
प्रवासाचा वेळ घटला; आता अवघ्या चार तासांत पोहोचणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर ते बीड या महत्त्वाच्या आणि बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेमू ट्रेनच्या वेगात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल १ तास ३५ मिनिटांनी (पावणेदोन तास) कमी झाला आहे. आता हा प्रवास अवघ्या चार तासांत पूर्ण होणार आहे. नव्या सुधारित वेळापत्रकामुळे अहिल्यानगर ते बीड प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.
पुणे विभाग, मध्य रेल्वेचे हे नवे सुधारित वेळापत्रक १ सप्टेंबर २०२६ पासून अधिकृतपणे लागू करण्यात आले आहे. अहिल्यानगर आणि बीडदरम्यान प्रवास करणारे दैनंदिन नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांची सोय व्हावी, तसेच त्यांचा बहुमूल्य वेळ वाचावा, या उद्देशाने प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे क्र. ७१४४१ (अहिल्यानगर-बीड डेमू) अहिल्यानगर स्थानकावरून सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांऐवजी ५० मिनिटे उशिरा, म्हणजे सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. मात्र, गाडीचा वेग वाढल्यामुळे ही रेल्वे बीड येथे पूर्वीच्या दुपारी साडेबारा वाजण्याऐवजी थेट सकाळी पावणेबारा वाजताच पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी बीड स्थानकावरून दुपारी १ वाजण्याऐवजी एक तास आधी, म्हणजे दुपारी १२ वाजता प्रस्थान करेल. अहिल्यानगर येथे ही रेल्वे जुन्या वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजण्याऐवजी तब्बल अडीच तास आधी, म्हणजे दुपारी चार वाजताच पोहोचेल.
येथे घ्या माहिती
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसारच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. सर्व स्थानकांवरील अचूक वेळेसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या पोर्टलवर किंवा NTES ॲपवर माहिती घ्यावी.
नेहमीचे थांबे कायम
या रेल्वेच्या प्रवासादरम्यान अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, वेताळवाडी, हाटोला, अमळनेर भांड्याचे, जटनानदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड या सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर नेहमीप्रमाणे थांबे कायम ठेवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.