PNE26W42671
अहिल्यानगर ः महापालिकेत महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. समवेत आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुकतेकर, उपसभापती वर्षा सानप आदी.
स्वच्छ, सुंदर, हरित शहराची संकल्पना प्रत्यक्षात आणू
महापौर ज्योती गाडे ः महापालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
अहिल्यानगर, ता. १६ ः देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जीवन जगत आहोत. आज देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहे. त्याचप्रमाणे अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास साधताना शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि विकसित करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती वर्षा सानप, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुकतेकर, उपायुक्त मेहर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता सुरेश इतापे, बाबासाहेब मुदगल, अग्निशामक दल विभागप्रमुख शंकर मिसाळ, अनिल लोंढे, सतीश ताठे आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाल्या, शहरातील विविध विकासाचे प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लागत आहेत. नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या अग्निशामक दल विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा संपूर्ण महापालिकेसाठी अभिमानाचा क्षण आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नागरिकांना उत्तम नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी, तसेच नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपली जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प केला.
.................
वृक्षसंवर्धनाचा संकल्प
जुन्या महानगरपालिका कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपायुक्त शहनवाज तडवी, अशोक साबळे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, किशोर कानडे आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान दोन वृक्ष लावून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी उपमहापौर जाधव यांनी केले. श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील विविध भागांत सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.