‘एआय’ आधारित उपकरणांच्या तीन ‘डिझाईन’ला पेटंट
सोलापुरातील कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. रणशूर यांच्या टीमचे यश
सुदर्शन सुतार : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १ : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रणशूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अत्याधुनिक सेन्सर्सचा वापर करून तयार केलेल्या ३ उपकरणांच्या ‘डिझाईन’ला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले आहे.
शेती क्षेत्रातील वाढता खर्च आणि हवामान बदलाच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे क्रमप्राप्तच झाला आहे. त्याला पूरक अशा उपकरणांच्या या डिझाईनला आता हे पेटंट मिळाल्याने शेतकऱ्यांचा शेतीखर्च कमी होण्यास मदत होणार आहे. ही उपकरणे भविष्यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवून उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. डॉ. रणशूर यांच्या नेतृत्वाखाली या उपकरणांच्या डिझाईन निर्मितीमध्ये डॉ. शशिशेखर खडतरे, डॉ. सुहास उपाध्ये, डॉ. अर्चना पवार, डॉ. अनिल जगधनी, डॉ. संजय तोडमल, डॉ. दत्तात्रेय सोनवणे आणि देशभरातील इतर कृषी शास्त्रज्ञांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
---
चौकट
काय आहेत ही तीन उपकरणे...
१. एआय आधारित पोर्टेबल मृदा पुनर्जनन उपकरण (AI-Based Portable Soil Regeneration Device) : जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी हे उपकरण सौरऊर्जेवर चालते. हे उपकरण केवळ मातीचे विश्लेषणच करत नाही, तर जमिनीतील पोषक तत्त्वांची कमतरता ओळखून आवश्यकतेनुसार बायोचार आणि सूक्ष्मजंतांचे (Microbes) अचूक डोस इंजेक्शनद्वारे जमिनीत देते. हे उपकरण आयओटी (IoT) सक्षम असून मोबाईलद्वारे ऑपरेट करता येऊ शकते.
२. माती-पाणी आयन विश्लेषण उपकरण (Soil-Water Ion Analysis Device) : अनेकदा प्रयोगशाळेचा अहवाल मिळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे उपकरण शेतात प्रत्यक्ष जागेवरच (In-situ) माती आणि सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण करते. पीएच (pH), क्षारता, सोडियम आणि क्लोराईडचे अचूक प्रमाण अवघ्या काही मिनिटांत कळल्यामुळे शेतकऱ्यांना खतांचे आणि पाण्याचे नियोजन तातडीने करणे शक्य होणार आहे.
३. पोषक कमतरता लीफ सेन्सर डिव्हाइस (Nutrient Deficiency Leaf Sensor Device) : पिकाच्या पानाला कोणतीही इजा न करता, हे सेन्सर पानाचा पृष्ठभाग स्कॅन करते. झाडाला नेमकी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचा रिअल- टाइम अलर्ट हे उपकरण देते. यामुळे अनावश्यक खतांचा वापर टाळला जाऊन पिकाचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.