पुणे

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक शरणागती

CD

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक शरणागती
‘एआय’चा शिक्षणावर होणारा परिणाम गांभीर्याने तपासणाऱ्या समितीच्या अहवालाचे मुख्य सूत्र असे आहे की, एआयने माणसाची जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढवावी आणि विचार करण्याचे काम माणसानेच करावे. आपल्याकडील तरुणांचे प्रश्न पाहिले तर या शिफारशीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
............................................................................................

डॉ. भूषण पटवर्धन
भारताची तरुण पिढी आज आत्मविश्वासाने जगासमोर उभी आहे. आंतरराष्ट्रीय गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थी पदके मिळवत आहेत. खेळाडू चमकत आहेत. छोट्या शहरांतूनही तरुण उद्योजक पुढे येत आहेत. ही ऊर्जा देशाच्या भविष्याविषयी आशा निर्माण करते. त्याचवेळी तरुणाईच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. चिंता, नैराश्य, एकटेपणा आणि अपयशाची भीती यांचे प्रमाण वाढत असल्याचे अनेक अभ्यास सांगतात. महाविद्यालयांचे परिसर अशांत होत आहेत. अपयश पचवणे अनेकांना कठीण जाते.
त्यात भर पडली आहे, कृत्रिम प्रज्ञेची. ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) ही संस्था ‘एआय’चा शिक्षणावर होणारा परिणाम तपासत आहे. समितीच्या अहवालातील निरीक्षणे भारतासाठीही महत्त्वाची आहेत. एखादी शंका आली की आधी बुद्धी चालवून उत्तर शोधण्याची सवय कमी होत आहे. शिक्षकांना शंका विचारण्याचे प्रमाणही घटले आहे. विचार करणे, शिक्षकांशी संवाद साधणे, या शिकण्याच्या महत्त्वाच्या पायऱ्या मागे पडत आहेत. मित्रांसोबत अभ्यासाचे प्रमाण घटले आहे. एकाकीपणा वाढत आहे. शिक्षक-विद्यार्थी नातेही कमकुवत होत आहे, अशीही निरीक्षणे त्यात आहेत.

विद्यार्थ्यांनाच काळजी वाटते
‘एमआयटी’च्या सर्वेक्षणांत ९० टक्के पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी एआयवर जास्त अवलंबून राहण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यापैकी ६७ टक्के विद्यार्थी ‘खूप चिंतित’ होते. ७० टक्के विद्यार्थ्यांना वाटते की, भविष्यातील नोकरीसाठी एआय कौशल्य महत्त्वाचे ठरेल; पण केवळ २५ टक्के विद्यार्थ्यांना आपली तयारी पुरेशी वाटते. एआयमुळे आपण अधिक सक्षम झालो असे ३४ टक्के पदवीपूर्व विद्यार्थ्यांना वाटते, तर ४० टक्के विद्यार्थ्यांना आपली जागा कोणीही घेऊ शकेल, अशी भीती वाटते.
अहवालात `बौद्धिक शरणागती’ या संकल्पनेचा उल्लेख आहे. अडचण आली की, स्वतः विचार करण्याआधीच एआयकडे उत्तर मागितले जाते. यंत्राकडून बरोबर उत्तर मिळाले की, आपल्याला ते समजले असा भ्रम होतो. शिकणे ही एक प्रकारची वैचारिक व्यायामशाळा आहे. आपल्या जागी दुसऱ्याने व्यायाम केला तर आपले स्नायू बळकट होत नाहीत. तसेच विचार करण्याचे प्रमाण कमी झाले तर मेंदू व बौद्धिक क्षमता विकसित होत नाही. गणिते सोडवताना होणारी धडपड, निबंध लिहिताना शब्द शोधण्याचे कष्ट, प्रयोग पुन्हा पुन्हा करून पाहण्याचा संयम, यातूनच बुद्धीचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास होत.

प्रत्येक उत्तर काही सेकंदांत मिळण्याची सवय लागली, तर वाट पाहण्याचा संयम कसा टिकेल? अहवालात या धोक्याकडे बोट दाखवले आहे. विद्यार्थी गृहपाठाला केवळ ‘उत्पादन’, शिक्षकांना केवळ ‘परीक्षक’ आणि पदवीला कमीत कमी कष्टात मिळवायची ‘वस्तू’ समजू लागतील, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. ही मानसिकता वर्गापुरती राहत नाही. ती काम, नाती आणि सामाजिक जबाबदारीकडे पाहण्याच्या दृष्टीतही उतरते. तीव्र दडपणामुळे विद्यार्थी कोणत्याही मार्गाने यश मिळवण्याकडे वळतात, असेही अहवाल नोंदवतो.
आजची तरुण पिढी ऊर्जावान, जिज्ञासू आणि प्रामाणिक आहे. अनेक तरुण समाजासाठी उत्तम काम करत आहेत. शॉर्टकट शोधण्याची वृत्ती मोठ्यांमध्येही दिसते आणि मुले तेच पाहून शिकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ तरुणांचा नाही. संपूर्ण समाजाने तो स्वतःला विचारायला हवा.

एआयचे अपेक्षित स्थान
मित्रांसोबतचा वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांशी झालेला संवाद यातूनच माणूसपण घडते. एआय उत्तम सराव साथीदार आणि मदतनीस ठरू शकते. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतील अवघड संकल्पना समजून घेण्यासाठी ते उपयोगी आहे. संशोधनासाठीही ते प्रभावी आहे. अहवालाचे मुख्य सूत्र असे आहे की एआयने माणसाची जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढवावी आणि विचार करण्याचे काम माणसानेच करावे. प्रगत एआय साधनांचा खर्च सर्वांना परवडत नाही, त्यामुळे शहरे आणि खेडी, श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.
शिक्षकांनी प्रत्येक विषयासाठी एआय वापराचे स्पष्ट नियम ठरवून त्यामागचे कारणही सांगावे. एमआयटीने यासाठी वाहतूक दिव्यांसारखी सोपी पद्धत सुचवली आहे: हिरवा म्हणजे मुक्त वापर, पिवळा म्हणजे मर्यादित मदतीपुरता वापर आणि लाल म्हणजे वापर बंद. तोंडी परीक्षा, वर्गातील चर्चा आणि गटप्रकल्प यांवर भर द्यावा. एआय शोधणाऱ्या सॉफ्टवेअरवर अवलंबून राहणे टाळावे, कारण ते अनेकदा चुकते आणि निर्दोष विद्यार्थ्यावर संशय येऊ शकतो.
विद्यार्थ्यांनी प्रश्नाचा स्वतः विचार करावा. प्रश्नाशी झुंजावे. मित्रांशी चर्चा करावी आणि गरज वाटल्यास शिक्षकांना विचारावे. तरीही अडचण राहिली, तर एआयची मदत घ्यावी. अशा क्रमाने शिकलेले ज्ञान मनात पक्के बसते आणि आत्मविश्वास वाढतो.
शिक्षण कसासाठी?
एआयमुळे निर्माण झालेले हे सगळे प्रश्न शेवटी एका मूलभूत प्रश्नाकडे येऊन थांबतात: शिक्षण कशासाठी? एमआयटीच्या अहवालानेही हाच प्रश्न उपस्थित केला. पदवी कमी कष्टात मिळवायची वस्तू बनत चालल्याची चिंता त्यात व्यक्त झाली आहे. बाजाराधारित शिक्षणव्यवस्थेत ज्ञान विक्रीची वस्तू बनत गेले. पाश्चात्त्य प्रारूपाच्या प्रभावाखाली आपली शिक्षणव्यवस्थाही याच मार्गाने गेली. एआयमुळे त्याचा वेग वाढेल.खरे तर आपल्या परंपरेत शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होती. तक्षशिला आणि नालंदा ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. नालंदा येथे चीन, कोरिया, तिबेट आणि आग्नेय आशियातून विद्यार्थी येत. राजे आणि गावे यांनी दिलेल्या दानातून तेथील व्यवस्था चालत असे. शिक्षणशुल्क ही संकल्पना नव्हती. शास्त्रार्थ आणि वादविवादाच्या परंपरेतून चिकित्सक पण संतुलित विचार घडत असे. संवेदनशील, जबाबदार आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारलेला समाज घडवणे हा शिक्षणाचा हेतू होता.

पूर्णत्वाचे प्रकटीकरण
आधुनिक काळातही हा विचार अनेकांनी पुढे नेला. स्वामी विवेकानंदांनी माणसातील अंगभूत पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण, असे सांगितले आणि चारित्र्य व माणूस घडवणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनमध्ये कला आणि मुक्त वातावरणात शिक्षणाचा प्रयोग केला. महात्मा गांधींच्या बुनियादी शिक्षणात मन, मनगट आणि हृदय यांचा एकत्रित विकास अपेक्षित होता. एमआयटीच्या अहवालानेही ‘मन, हात आणि हृदय’ या सूत्राकडे परत जाण्याची गरज मांडली आहे, हा योगायोग लक्षवेधी आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ ने या परंपरेचा आधार घेऊन समग्र आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाची दिशा दाखवली आहे. ती प्रत्यक्ष वर्गात उतरायला हवी. व्यक्तीचे, समाजाचे आणि संस्कृतीचे परिवर्तन आणि सर्वांचे कल्याण हा शिक्षणाचा हेतू हवा. ‘एआय’बाबतचा निर्णय सोपा होतो. जे साधन विद्यार्थ्याची जिज्ञासा, विवेक आणि संवेदनशीलता वाढवते ते स्वीकारावे. जे त्याला परावलंबी बनवते त्याबाबत सावध राहावे. ‘सा विद्या या विमुक्तये’, म्हणजे जी मुक्त करते तीच खरी विद्या. अज्ञान, भय, लोभ आणि परावलंबन यांपासून मुक्त करणारे शिक्षण हेच ध्येय असावे. ‘एआय’अवलंबित्वातून मुक्तता हा त्याचाच एक भाग आहे.

चौकट
आपण काय करू शकतो?
पालकांनी मुलांशी सकारात्मक संवाद ठेवावा. मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे आणि इतरांशी तुलना टाळावी. गृहपाठ त्यांच्या शब्दांत समजावून सांगायला सांगावे. अपयश हा शिकण्याचाच भाग आहे, हे घरात सहजपणे बोलले जावे. मुले ऐकलेल्या उपदेशापेक्षा पाहिलेल्या वागण्यातून जास्त शिकतात. पालक स्वतः तासन्‌तास रील्स पाहत असतील, तर ‘मोबाईल बाजूला ठेव’ हा सल्ला मुलांना पटणार कसा? आपण जे सांगतो ते आधी स्वतः आचरणात आणले, तरच आपल्या शब्दांना वजन येते. रोज काही वेळ संपूर्ण कुटुंबाने मोबाईल बाजूला ठेवून गप्पा, वाचन आणि खेळासाठी राखून ठेवावा.


(संदर्भ: शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षणातील AI च्या वापरावर MIT विशेष समिती अहवाल, १३ ऑगस्ट २०२६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT