रांची, ता.१० (पीटीआय) ः ‘‘ भारत सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वाटंम तंत्रज्ञानामुळे काही नव्या शक्यता निर्माण होतील,’’ असे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजितकुमार मोहंती यांनी आज केले. मोहंती यांच्याकडे अणुऊर्जा विभागाच्या सचिवपदाचा देखील कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. मेसरा येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ३६ व्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
‘‘भारत तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्थित्यंतराच्या काळामध्ये प्रवेश करतो आहे. एआय, क्वाटंम तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, अवकाश विज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि अत्याधुनिक निर्मिती तंत्र यामुळे नव्या शक्यतांची निर्मिती झाली आहे. विकसित भारतासाठी भक्कम अशा स्वदेशी क्षमतांची गरज आहे. वैज्ञानिक, अभियंते आणि उद्योजकांची कुशल पिढी आपल्याला तयार करावी लागेल. मनुष्यबळ विकासाला शाश्वत संशोधन, आंतरविद्याशाखीय समन्वय आणि गुंतवणुकीचे बळ द्यावे लागेल,’’ असे मोहंती यांनी नमूद केले. कल्पक्कम येथील अणु प्रकल्पाने ऊर्जा निर्मितीच्याबाबतीत गाठलेल्या महत्त्वपूर्ण अशा टप्प्याचाही त्यांनी उल्लेख केला. तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या प्रगतीमुळेच हे यश आपल्याला साध्य करता आले, यासाठी दीर्घकालीन संशोधन, सातत्यपूर्ण प्रयत्न, आंतरविद्याशाखीय समन्वय आणि मनुष्यबळ विकासातील गुंतवणूक हे मुद्दे महत्त्वाचे ठरल्याचेही मोहंती यांनी सांगितले.
मोहंती म्हणाले
- आपल्याला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवठा करू शकणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज आहे. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा कराव्या लागतील, अन्न सुरक्षा वाढवावी लागेल, पाण्याची बचत करावी लागेल तसेच उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन उपलब्ध होण्यासाठी पर्यावरणाचे देखील संरक्षण करावे लागेल.
- ‘एआय’ हे आरोग्यसुविधा आणि जैवतंत्रज्ञानासोबत काम करू शकेल, फोटोनिक्स औषधनिर्माण क्षेत्रात कामी येईल, अत्याधुनिक साधने ऊर्जा तंत्रज्ञानाला आधार देतील, डेटा विज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणीय घटकांवर लक्ष ठेवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आल्याने निर्मिती क्षेत्राची चौकटच बदलेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.