Loksabha Election 2024  sakal
पुणे

Ajit Pawar : पूर्वी आम्ही फक्त राबत होतो आता मोदींमुळे आमचीही आदानी अंबानी यांच्याशी होतीय ओळख, अजित पवारांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा कारभार करेल असा दुसरा नेता समोर नाही. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. दहा वर्षे विरोध करण्यात गेली.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा कारभार करेल असा दुसरा नेता समोर नाही. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. दहा वर्षे विरोध करण्यात गेली. पुढील पाच वर्षात सुद्धा विरोध केला तर आपली कामे होणार नाहीत. त्यासाठी महायुतीच्या विचाराचा खासदार संसदेत पाठवणे गरजेचे आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कण्हेरी (ता. बारामती ) येथे शनिवारी (ता.२०) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील मारुती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, काल माझ्यावर येथे झालेल्या सभेत आरोप करण्यात आले. आरोप केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत. बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली असे सांगितले गेले.

मात्र ही कर्जमाफी करताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पी. चिदंबरम हे सगळेजण यामध्ये होते. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणली. १९९१ मध्ये माझ्याबद्दल काही व्यक्ती पवार साहेबांना म्हणाल्या होत्या की, आपल्या पुढील पिढीने राजकारणात आले पाहिजे. त्यावेळी साहेब म्हणाले होते फक्त अजितला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे. बाकीच्यांना धंदापाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मात्र आता सगळ्यांनीच धंदा पाणी सोडले आणि प्रचाराला लागले आहेत.

खासदारकीला इकडे मतदान करा विधानसभेला आम्ही फिरणार नाही असाही प्रचार काहीजण करत आहेत. मात्र आपल्याला खासदारकीलाही इकडेच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा. विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारचा निधी आवश्यक असतो. आपल्या विचाराचा खासदार असेल तर आम्ही नरेंद्र मोदी यांना सांगू शकतो की आम्हालाही विकास कामांसाठी निधी द्या. काहीजण शेवटच्या सभेत रडतील, डोळ्यात पाणी आणतील, त्यामुळे कोणत्याही भावनिक अवाहनाला बळी न पडता घड्याळाला मतदान करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

यावेळी विजय शिवतारे, मंगलदास बांदल, ऍड. सुधीर पाटसकर, यशवंत वाघमारे, वासुदेव काळे, निलेश देवकर, सुरेंद्र जेवरे आधी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भाषणे झाली. यावेळी माळेगावचे अध्यक्ष केशव जगताप, सोमेश्वरचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे प्रशांत काटे, प्रदीप गारटकर, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, जय पवार, प्रवीण माने आदी महायुतीतील नेते उपस्थित होते. तसेच परिसरातील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2017 मध्ये राजेंद्र पवार यांनी रोहित साठी माझ्याकडे तिकीट मागितले होते. राजू दादांची मागणी मी साहेबांना कळवली. मात्र साहेबांनी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. राजकारणात आणखी कुणी यायचे नाही. आपला बारामती अग्रो सांभाळा असे त्यावेळी साहेबांनी सांगितले. मात्र राजू दादांनी जिल्हा परिषदेच्या त्या निवडणुकीत रोहित अपक्ष फॉर्म भरणार असल्याचे सांगितले. त्यावेळी एबी फॉर्म माझ्याकडेच होते. साहेबांना न सांगता मी रोहितला एबी फॉर्म दिला. त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील खडकवासला येथून मला उभे राहायचे आहे असे रोहितने माझ्यापाशी सांगितले.

कर्जत जामखेड मध्ये माझे काम चांगले असल्याने मी त्याला म्हणालो तू कर्जत जामखेड साठी प्रयत्न कर. तत्पूर्वी हडपसर मधून सुद्धा त्यांनी तिकीट मागितले होते. माझे सासरे तिथे असल्याने मला मदत होईल असे तो म्हणाला होता. याबाबत सविस्तर काय ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेच आहे. आणि आता हीच मंडळी साहेबांच्या जवळ बसून माझ्यावर टीका करत आहेत, मागील काही घटनांची अशा पद्धतीने उकल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.

नीरा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. उपसा सिंचन योजना राबवून हे पाणी पुरंदर, बारामती इंदापूर भागातील दुष्काळी गावांना कसे देता येईल याविषयी आमची योजना तयार आहे. अर्थमंत्री जरी मी असलो तरी माझ्या एकट्याच्याने हा निधी होणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य जागतिक बँकेचे सहकार्य आवश्यक आहे.

आपल्या विचाराचा खासदार निवडून आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत निधी मागू शकतो. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा कौल मिळत आहे. त्यामुळे आपण देखील महायुतीचा खासदार येथून निवडून द्या. आता आमची सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यासोबत तसेच आदानी अंबानी या मोठमोठ्या लोकांबरोबर ओळख तयार व्हायला लागली आहे. पूर्वी आम्ही फक्त राबत होतो, असा टोला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT