जनतेचे ‘दादा’
- शंकर मांडेकर, आमदार
(मुळशी-राजगड-वेल्हा विधानसभा मतदारसंघ)
राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे केवळ पदामुळे मोठी होत नाहीत, तर आपल्या कार्य, निर्णयक्षमता आणि माणुसकीच्या नात्यामुळे अजरामर होतात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार हे असेच एक व्यक्तिमत्त्व. जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना मन भरून येते. महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा, निर्णय घेण्याचे धाडस असलेला आणि कार्यकर्त्यांवर अपार प्रेम करणारा नेता आज आपल्यात नसला, तरी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रकाश आपल्या सर्वांना कायम मार्गदर्शक राहील.
------------
विश्वास, जिव्हाळ्याचे नाते
अजितदादा आणि माझे नाते हे केवळ राजकीय नव्हते, तर ते विश्वास, जिव्हाळा आणि विकासाच्या समान ध्येयाने जोडलेले होते. दादांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्या कार्यक्षमतेचा सन्मान होता. एखादा प्रश्न मांडला, की त्यावर तातडीने निर्णय घेण्याची दादांची कार्यपद्धती अनेकांनी अनुभवली. विकासकामे ही केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, हा त्यांचा कटाक्ष होता. मुळशी, भोर आणि वेल्हा या डोंगराळ व ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी दादांना समजत होत्या. रस्ते, पाणी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार या प्रत्येक विषयाकडे त्यांनी विकासाच्या दृष्टीने पाहिले.
विश्वास वाटणारे नेतृत्व
दादांच्या मार्गदर्शनाखाली मी मतदारसंघातील अनेक प्रश्न सातत्याने मांडले. त्या प्रत्येक प्रश्नामागे जनतेचे हित आहे, हे दादांनी ओळखले आणि शक्य त्या ठिकाणी प्रशासनाला गती दिली. अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत मोठा गुण म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. निर्णय घ्यायचा, तर ठाम घ्यायचा आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारायची, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे अधिकारी असोत किंवा कार्यकर्ते, प्रत्येकाला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास वाटत असे. काम करणाऱ्या माणसाला ते नेहमीच पाठबळ देत. त्यामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी राजकारणात संधी दिली, घडवले आणि नेतृत्वाची ताकद दिली.
नेता नव्हे, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती
अजितदादांनी सदैव जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. एखाद्या गावातील छोटासा प्रश्न असो किंवा राज्याच्या विकासाशी संबंधित मोठा निर्णय असो, त्यामागे लोकहित हेच त्यांचे ध्येय असायचे. दादांचा स्वभाव कठोर वाटत असला, तरी त्यांच्या मनात कार्यकर्त्यांबद्दल अपार माया होती. संकटात सापडलेल्या कार्यकर्त्याला धीर देणे, एखाद्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणे आणि गरज पडल्यास प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश देणे, हे त्यांच्यासाठी नित्याचे होते. म्हणूनच असंख्य कार्यकर्त्यांसाठी ते केवळ नेता नव्हते, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती होते.
प्रेरणेचा अखंड स्रोत
दादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एक ना अनेक आठवणी जाग्या होत आहेत. त्यांच्या भाषणातील आत्मविश्वास, विकासाची दृष्टी, कामाचा वेग आणि जनतेसाठी असलेली तळमळ प्रत्येकाच्या मनात कायम आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले योगदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. माझ्यासाठी दादा हे केवळ राजकीय मार्गदर्शक नव्हते, तर प्रेरणेचा अखंड स्रोत होते. जनतेसाठी काम करताना प्रामाणिकपणा, चिकाटी आणि विकासाची बांधिलकी कशी जपावी, हे आम्ही दादांकडून शिकलो. म्हणूनच आजही मी प्रत्येक विकासकामात दादांची शिकवण आठवत पुढे वाटचाल करत आहे.
लोकसेवेची नवी उर्जा
एखादा नेता काळाच्या पडद्याआड जातो. पण, त्यांचे विचार, कार्य आणि संस्कार कायम जिवंत राहतात. अजितदादांनी महाराष्ट्राला दिलेली विकासाची दिशा, निर्णयक्षम नेतृत्व आणि जनतेशी जोडलेले नाते हे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या कार्यातून असंख्य लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना लोकसेवेची नवी उर्जा मिळत राहील. विकास, प्रामाणिकपणा, लोकहित आणि समाजसेवेचा आपण संकल्प केल्यास तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘‘दादा, आज आपण आमच्यात नसाल; पण आपल्या विचारांचा दीप आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे. आपल्या कार्याची प्रेरणा आणि जनतेसाठी झटण्याची शिकवण आमच्या प्रत्येक पावलाला दिशा देत राहील. महाराष्ट्राच्या विकासगाथेत आपले नाव सदैव अजरामर राहील. आपल्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी विनम्र अभिवादन.’’
जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा
वर्ष २००२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य अशा जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एक लाख रुपये पहिले बक्षीस, दुसरे ७५ हजार, तिसरे ५० हजार, चौथे ४१ हजार, २१ हजार, १७ हजार रुपये या भरघोस बक्षिसांसह मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट झेल, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार या व क्रिकेटमध्ये असलेल्या प्रत्येक प्रकारासाठीच्या खेळाडूंना प्रोत्साहनपर रोख बक्षिसांचे वाटप खेळाडूंना करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील अव्वल दर्जाचे क्रिकेट संघ सहभागी झाले होते. तर, स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी तत्कालीन भारतीय संघातील प्रसिद्ध व लोकप्रिय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर, सुरेंद्र भावे यांच्यासह देशभरातील नामांकित क्रिकेटपटूंची प्रमुख उपस्थिती होती. भव्य-दिव्य आणि डोळे दीपवणाऱ्या व अतिशय तगडे संयोजन व आयोजन असलेल्या या स्पर्धांकडे आणि आयोजक शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. पण, आपल्या कार्याची चुणुक दाखवत दिग्गज राजकारण्यांसह सर्वांनीच माझी दखल घेतली. तेव्हा अनेक नेते मंडळींनी ‘‘तू तालुक्यात देखील येत जा, तुझे काम चांगले आहे’’ असा मौलिक सल्लाही देत तालुक्यात पाचारण केले.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात
२००७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होत्या. मी लागलीच एक-दोन वर्षे आधी सुरुवात केली. मात्र, तत्पूर्वी मला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक संघटनेचे अध्यक्षपद हवे होते. त्यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ नेते हरपुडे दादांचीदेखील सकारात्मक भूमिका होती. त्यासाठी हरपुडे दादांनी पुढाकार घेतल्याने आम्ही अजितदादांना मुंबईला भेटण्यासाठी निघालो. तिथे गेल्यावर तालुक्यातील सर्व प्रमुख व मुरब्बी नेतेमंडळी उपस्थित होती. त्यावेळेस सर्वांशी तालुकाध्यक्ष पदाबद्दल चर्चा झाली. आम्ही आत गेलो असता, चिठ्ठी मात्र दुसऱ्याच्याच नावाची निघाली. त्यामुळे माझ्या हाती काहीच न लागता ते पद दुसऱ्याला गेले. मात्र, तेव्हाच ठरवले, की काहीही करून पद घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. पण, तेही आता युवक संघटनेचे नको; तर मुख्य संघटनेचे तालुकाध्यक्ष पद मिळवायचेच, हा ठाम निश्चय केला आणि येथूनच सुरुवात झाली खऱ्या राजकीय कारकिर्दीला. त्यावेळी राजकारण करणाऱ्या तालुक्यात एकहाती वर्चस्व असलेल्या त्या ज्येष्ठ नेत्यांचा कुठलाही तिरस्कार अथवा राग मनात न धरता अविरतपणे सामाजिक काम सुरूच ठेवले. मात्र, ज्यांनी माझ्या नावाची चिठ्ठी आत दिलीच नाही; त्या सर्व मंडळींचे सामाजिक-राजकीय जीवन संपले असून ते आता घरी आराम करत आहेत.
कार्याचा अविरत संकल्प
वर उल्लेख केलेल्या घटनेचा स्वतःवर परिणाम न होऊ देता तसेच निराशेच्या छायेत न राहता मी आपले सामाजिक व राजकीय कार्य अविरतपणे सुरूच ठेवले. जनमानसात जाण, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणे आणि अडचणीत धावून जाणे हा नित्यक्रम सुरूच होता. त्यामुळे प्रचंड जनसंपर्क वाढला. त्यासह नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवांच्या आयोजनांसह बैलगाडा शर्यती, क्रिकेट स्पर्धा, कुस्ती स्पर्धा व अन्य स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जायचे. सामाजिक राजकीय कामांद्वारे घराघरात व तालुक्यात माझे नाव आघाडीवर होते. हजारो कार्यकर्ते मी पुढाकार घेऊन स्वतःच्या मेहनतीतून तयार केले होते. अशातच २००८ च्या सुमारास मी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची मागणी केली. त्यावेळेस सुद्धा अनेक जण इच्छुक होते. दांडगा जनसंपर्क, सामाजिक कामांचा मागे मोठा वारसा, कार्यकर्त्यांची मोठी खंबीर फळी पाठिशी असूनही केवळ कुठलाही राजकीय वारसा नसल्याने माझ्या नावाची कोणीही शिफारस करत नव्हते. घोटावडे येथे एकदा सुप्रियाताई सुळे यांचा मेळावा होता. त्यावेळी अशोकअण्णा मोहोळ खासदार होते. त्यांच्याकडे ‘‘अध्यक्षपदासाठी मी इच्छुक असून तुम्ही माझा विचार करावा. अन्यथा मी तुमचा विचार करणार नाही,’’ अशी स्पष्ट भूमिका घेत सुप्रियाताईंना दोन मिनिटे भेटण्याची विनंती केली. त्यावेळेस आम्ही तब्बल दोन हजार कार्यकर्ते जमले होतो. हे सर्व कार्यकर्ते भर उन्हात माझ्यासोबत उभे होते. इतका कार्यकर्त्यांचा गराडा पाहून सुप्रियाताईंचे लक्ष गेले आणि त्यांनी मला बोलवून घेतले. ताईंना भेटून मी इच्छुक असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी विचार करण्याची ग्वाही दिली. तालुक्यात अन्य प्रतिस्पर्धीदेखील या पदासाठी इच्छुक होते. आठ ते नऊ जणांच्या त्या यादीत कुठलाही राजकीय वारसा व पाठिंबा नसल्याने माझे नाव शेवटून पहिले होते. मात्र, जनमानसात अध्यक्षपदासाठीच्या चर्चेत नाव आघाडीवर असतानाच काही चुकीचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मुळशीतील गुन्हेगारीत माझे नाव गोवले गेले. ‘‘शंकर मांडेकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यासोबत असलेले सर्व कार्यकर्तेदेखील गुंड प्रवृत्तीचे आहेत,’’ असा गवगवा करण्यात आला. त्यामुळे माझे पद पुन्हा एकदा लांबणीवर पडले.
अजितदादांची पुन्हा भेट
काही विश्वासू मित्रमंडळींना घेऊन मी पुन्हा अजितदादांना भेटण्यासाठी दौंडला गेलो. त्यादरम्यान पुण्यातील काही भाईगिरी टोळ्यांचे प्रकरण गाजत होते. त्यावेळी चर्चा केली असता दादा म्हणाले, ‘‘अरे शंकरभाऊंचे नाव गुन्हेगारांशी जोडले गेलेले आहे.’’ त्यावेळी मी दादांना ठामपणे उत्तर दिले, ‘‘दादा, पौड, चतु:शृंगी, हिंजवडी व अन्य कुठल्याही पोलिस ठाण्यात माझ्यावरती एक जरी गुन्हा असेल किंवा बीडीओ, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी या कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यास मी धमकावले असेल कोणाचाही आरोप असेल सर्वांना आपण प्रत्यक्ष बोलून विचारा. केवळ राजकीय लोकांना विचारू नका. माझ्यावर एकही आरोप झाला तर मला पद देऊ नका. मात्र, हे सर्व आरोप बिनबुडाचे निघाले तर मला पद द्या. कारण, माझ्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.’’ अशी मागणी केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दादांनी तातडीने फोनद्वारे चौकशी करत ‘‘मुळशीच्या अध्यक्षपदाचे काय झाले?’’ अशी विचारणा केली. त्या यादीत शंकर मांडेकर यांचे नाव आहे का?, तो कसा आहे अशी विचारणा केली. त्यावर तत्कालिन जिल्हाध्यक्ष बेनके म्हणाले, ‘‘पोरगा अतिशय उत्कृष्ट आहे. तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या मागे आहे. मात्र, केवळ आणि केवळ कुठलीही राजकीय शिफारस नसल्याने तो तरुण मागे आहे.’’ हे ऐकताच दादांनी त्यांना ‘‘पद देऊन टाका’’ असा थेट आदेशच दिला आणि तत्काळ बेनके यांचा मला फोन आला आणि सांगितले, की ‘‘उद्या येऊन नियुक्तीपत्र घेऊन जा...’’
नियुक्तीपत्र घेण्यासाठी माझा सहकारी मित्र नंदकुमार भोईर यांच्यासह काही विश्वासू कार्यकर्त्यांना व मित्रमंडळींना घेऊन मी भीमाशंकरला गेलो. माघारी येईपर्यंत संबंध तालुक्यात निवडीचे फ्लेक्स झळकले होते. आता खऱ्या अर्थाने राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती.
राजकीय जीवनाची वाटचाल
त्यावेळी पंचायत समिती राष्ट्रवादीकडे नव्हती. तेव्हा मी दादांना सांगितले, की ‘‘दादा काही जागांचे नियोजन अशा पद्धतीने केले पाहिजे, तरच आपल्याला पंचायत समिती काबीज करता येईल. मी सांगेन तशा पद्धतीने सीट वाटप करा. मी तुम्हाला पंचायत समिती देतो’’. दादांनीही त्यांचे ऐकले अन् पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आली आणि माझ्या राजकीय जीवनाची वाटचाल दादांच्या सहकार्याने अशा प्रकारे सुरू झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.